राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी १८ मे रोजी लसीचा दुसरा डोस घेतला. आरोग्य मंत्र्यांनी ट्विट करत याची माहिती दिली होती. त्यानंतर राजेश टोपेंना ३० दिवसांनंतर लसीचा दुसरा डोस कसा मिळाला असा प्रश्न अनेकांकडून विचारण्यात येत होता. राजेश टोपे यांनी लसीचा पहिला डोस हा १९ एप्रिल रोजी घेतला होता. त्यानंतर आता १८ मे म्हणजेच ३० दिवसांनी लसीचा दुसरा डोस घेतला. सामान्य नागरिकांना लसीचा पहिला डोस मिळाला नसताना आरोग्य मंत्र्यांना ३० दिवसांमध्ये दुसरा डोस कसा मिळाला असा सवाल अनेक जण सोशल मीडियावर विचारत होते. त्यावर आता आरोग्य मंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. राजेश टोपे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या गाईडलाईन नुसार कोविन पोर्टलवर लसीकरणासाठी देशभरात नोंदणी करण्यात येत आहे. त्यानुसार लसीकरणाची वेळ नागरिकांना देण्यात येते. राज्यात नागरिकांना कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसींचे दोन डोस देण्यात येत आहे. नोंदणी केल्यानंतरच लसीकरणासाठी वेळ ठरवून दिली जाते. कोव्हिशिल्डच्या पहिल्या डोस नंतर नविन गाईडलाईननुसार ८० दिवसांनी आता दुसरा डोस मिळणार आहे. तर कोव्हॅक्सिन लसीच्या कालावधीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. कोव्हॅक्सिनच्या पहिल्या डोस नंतर ३० दिवसांनी दुसरा डोस घेता येतो.

राजेश टोपे यांच्यावर दुसरा डोस घेतल्यानंतर टीका करण्यात येऊ लागली होती. त्यावर आता राजेश टोपेंनी आता उत्तर दिलं आहे. “मी ‘कोवॅक्सिन’ लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार ३० व्या दिवशी दुसरा डोस घेतला. दोन डोसमध्ये सुमारे ८० दिवसांचे अंतर ठेवण्याचा नवा नियम ‘कोविशिल्ड’ लसीसाठी आहे. ‘सुज्ञांस अधिक सांगणे न लगे’…” असे आरोग्य मंत्र्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

केंद्र शासनाच्या नविन नियमांनुसार कोव्हिशिल्ड लसीच्या दुसऱ्या डोससाठी ८० दिवसांचा कालावधी मध्ये देण्यात आला आहे. मात्र कोव्हॅक्सिन लसीसाठीच्या कालावधीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस हा ३० दिवसांनी घेणे गरजेचे असते. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोव्हॅक्सिन लसीचा डोस १९ एप्रिमध्ये घेतल्याने ३० दिवसांनी १८ मे रोजी त्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला. ‘सुज्ञांस अधिक सांगणे न लगे’ असे म्हणत त्यांनी टीका करणाऱ्यांना सुनावले आहे.