“मंत्री छगन भुजबळ यांच्या संघटनेने सरकार विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला, याचा अर्थ त्यांचा सरकारवर विश्वास नाही!OBC च्या खांद्यावर बंदूक ठेऊन राजकारण साधण्याचा हा प्रयत्न असून, मुख्यमंत्र्यांनी राजकीय आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही, तर पदाचा राजीनामा देण्याचं धाडस दाखवणार का?” असा सवाल विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी समता परिषदेचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांना केला आहे.

मराठा समाजाचे आरक्षण टिकावे म्हणून सरकारच्या पातळीवर जी धावपळ दिसते तशी इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाबाबत दिसत नाही, अशी खंतही व्यक्त करून, समाजाचा आक्रोश समोर आणण्याच्या उद्देशानेच आंदोलन करण्यात येणार असल्याचे भुजबळ म्हणाले आहेत. यावरून भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

प्रवीण दरेकर म्हणाले की, “सरकारमधीलच मंत्री व त्यांचीच संघटना आंदोलनासाठी उतरते, याचा अर्थ एकतर सरकारवर विश्वास नाही किंवा सरकारकडून काम करून घ्यायचं नाही. आपल्याल तो मुद्दा म्हणून त्या ठिकाणी आपलं राजकारण करायचं असा याचा स्पष्ट अर्थ होतो. छगन भुजबळ या राज्याचे एक वजनदार नेते आहेत. सरकारमधील महत्वाचे मंत्री आहेत. ओबीसी संदर्भात राज्य सरकारने जे केलं पाहिजे, ते कॅबिनेटमध्ये अथवा मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून समाजाला ते देऊ शकतात. परंतु दुर्दैवाने ते होताना दिसत नाही. ओबीसींच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपलं राजकारण साधता येतंय का? अशाप्रकारचा प्रयत्न या मागे दिसतोय.” तसेच, भुजबळांनाच समाजाविषयी एवढी कणव असेल, तर त्यांनी सरकारला आव्हान द्यावं की ओबासी समजाचा हा राजकीय आरक्षणाचा वेळेत सोडवला नाही, तर मी माझ्या पदाचा राजीनामा देतो.भुजबळ हे धाडस दाखवतील का?” असा सवाल दरेकरांनी भुजबळांना केला आहे.

तसेच, “जो सरकारशी संबधित प्रश्न आहे, ज्या सरकारचा भुजबळ एक भाग आहेत. त्यांनी सरकारमध्ये बसून कॅबिनेटमध्ये बसून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्यातून मार्ग काढायला पाहिजे. परंतु या ठिकाणी सरकारशी चर्चा होत नाही. कॅबिनेटमध्ये किंवा सरकारचा निर्णय होत नाही, ज्या त्या गोष्टी रस्त्यावर बोलल्या जात आहेत आणि रस्त्यावर बोललेल्या गोष्टींकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे कुठलाही ताळमेळ दिसत नाही.” अशी दरेकर यांनी टीका केली आहे.

ओबीसींमध्ये देखील नेतृत्वासाठी स्पर्धा लागलेली आहे –

“ओबीसींमध्ये देखील नेतृत्वाची स्पर्धा लागलेली आहे. काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांना वाटतंय या निमित्ताने ओबींसा नेता मी होईल, छगन भुजबळ तर ओबीसींसाठी अगोदरपासून काम करत आहेत. अन्य नेते देखील ओबीसी समाजासाठी काम करू पाहत आहेत.” असं दरेकर म्हणाले आहेत.

आणखी वाचा- Maratha Kranti Morcha: मूक आंदोलनानंतर संभाजीराजेंचा मोठा निर्णय; म्हणाले…

मागासवर्ग समाजात आरक्षण रद्द झाल्याने असंतोष – भुजबळ

दरम्यान, आरक्षण वाचविण्यासाठी मराठा समाज आक्रमक झालेला असतानाच, राजकीय आरक्षण टिकावे म्हणून इतर मागासवर्गीय समाजाच्या (ओबीसी) वतीने आक्रोश आंदोलन सुरू करण्यात येत आहे. महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा आदी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इतर मागासवर्गीय समाजाचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने रद्द झाले. राजकीय आरक्षण कायम राहावे म्हणून आघाडी सरकारने पाठपुरावा सुरू केला. मागासावर्ग आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती करून प्रक्रिया सुरू केली असली, तरी इतर मागासवर्ग समाजात आरक्षण रद्द झाल्याने असंतोष असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.