एजाज हुसेन मुजावर, लोकसत्ता

सोलापूर : करोना टाळेबंदीमुळे रुतलेल्या अर्थचक्राला चालना देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नोकरी, व्यवसाय, उद्योगधंद्यांतील भवितव्याची चिंता सतावत असताना आर्थिक अडचणीतून मार्ग काढण्याची विवंचना आहे. संघटित, असंघटित, सामाजिक सुरक्षा असो वा नसो, सर्वच घटकांची रोजच्या जीवनातील रणांगणावरची लढाई लढताना कसोटी लागत आहे. नेमक्या याच संकटाच्या काळात अवैध सावकारी धंद्याने जोर धरला असून यात आर्थिक अडचणीत सापडलेले छोटे-मोठे व्यापारी, व्यावसायिक, उद्योजक, पगारी नोकरदार, कामगार, मजूर, फेरीवाले, सेवानिवृत्त आदी घटकांच्या गळ्याभोवती अवैध खासगी सावकारीचा पाश दिवसेंदिवस आवळत चालला आहे.

कर्जवसुलीसाठी खासगी सावकारांकडून झालेल्या अशा त्रासामुळे वैतागून अलीकडेच सोलापुरात एका ऑर्केस्ट्रा बारचालकाने पत्नीसह दोन मुलांची हत्या करून आत्महत्या केली. यात खासगी सावकारीचा धंदा आणि त्यात गुंतलेल्या विविध राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींसह तथाकथित समाजसेवकांचे चेहरेही उघड झाले आहेत. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी, गल्लीबोळात बोकाळलेल्या बेकायदा खासगी सावकारांच्या मुसक्या आवळायला सुरुवात केली आहे. त्यासाठी धडकमोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेला नजीकच्या काळात राजकीय हितसंबंधीयांकडून ‘खो’ घातला जाण्याची भीतीही व्यक्त होत आहे. मात्र अशा राजकीय दबावाला भीक न घालण्याची खंबीर भूमिका पोलीस आयुक्त शिंदे यांनी घेतली आहे.

मुरारजी पेठेतील हांडे प्लॉटमध्ये अमोल जगताप नावाच्या एका बारचालकाने सावकारांच्या छळाला वैतागून पत्नी व दोन मुलांची हत्या करून आत्महत्या केली होती. या प्रकरणाचा छडा लावत पोलिसांनी शिवसेनेचे नगरसेवक लक्ष्मण जाधव आणि यापूर्वी ‘एमपीडीए’खाली दोन वेळा स्थानबद्ध झालेला दशरथ कसबे यांच्यासह अन्य खासगी सावकारांना अटक केली होती. या प्रकरणापाठोपाठ संतोष श्रीराम (रा. उमानगरी, मुरारजी पेठ सोलापूर) या उद्योजकालाही सावकारांनी कर्जवसुलीसाठी सातत्याने छळले होते. त्यामुळे श्रीराम वैतागून वर्षभर बेपत्ता झाले होते. त्यांच्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी बारा सावकारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यात यापूर्वी अमोल जगताप आत्महत्या प्रकरणात अडकलेल्या तीन सावकारांचा समावेश आहे. त्यानंतर आता महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते किसन जाधव यांच्याविरुद्धही बेकायदा खासगी सावकारी करून, व्याजासह कर्जवसुलीसाठी एका गरीब तरुणाच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद झाला आहे. हंबीरराव किसन जाधव (वय ८०, रा. पोगूल मळा, रामवाडी, सोलापूर) या वृद्ध सेवानिवृत्त नोकरदारावर बेतलेला प्रसंग तर खूपच धक्कादायक आहे. हंबीरराव यांना २० वर्षांपासून खासगी सावकार छळत आहेत. त्यांनी घेतलेल्या २० हजारांच्या कर्जापोटी आतापर्यंत १२ लाखांची रक्कम उकळूनदेखील आणखी साडेतीन लाखांच्या वसुलीसाठी त्यांच्या मासिक निवृत्तिवेतनाची रक्कमच वळती केली जात आहे. त्याचीही दखल घेऊन पोलिसांनी संबंधित खासगी सावकाराच्या मुसक्या आवळल्या आहेत. हे उजेडात येणारे प्रकार हिमनगाचे टोक आहे.

खासगी सावकारांच्या आर्थिक पिळवणुकीला पायबंद घालण्यासाठी कायद्यात सुधारणा केली असली तरी त्याचा प्रभाव जाणवताना दिसत नाही. सोलापुरात बेकायदा खासगी सावकारी धंद्यात प्रामुख्याने शोषित वर्गातीलच गुन्हेगारी प्रवृत्तीची मंडळी सक्रिय आहेत. या सावकारांचे सावजही बहुतांशी शोषित वर्गातीलच असतात. काही वर्षांपासून गुन्हेगारी मंडळींनी कोणताही अधिकृत परवाना नसताना कायदा धाब्यावर बसवून खासगी सावकारी धंद्यात शिरकाव केला आहे. आज त्यांचे जाळे शहरभर गल्लीबोळात पसरले आहे.

‘रेल्वे रुळापलीकडील’ भाग बेकायदा खासगी सावकारी धंद्यासाठी कुप्रसिद्ध मानला जातो. ही सावकार मंडळी सर्व राजकीय पक्षांशी संबंधित आहेत. यातील काहीजण स्वत:ची राजकीय व सामाजिक प्रतिमा उजळविण्यासाठी विविध सार्वजनिक उत्सव साजरे करतात. सामूहिक विवाह सोहळेही आयोजित करून स्वत:ला समाजसेवक म्हणवून घेतात. राजकीय व सामाजिक संघटनांच्या आडून सावकारी धंदा करताना विविध सार्वजनिक उत्सवांमध्ये याच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सावकारांचा पुढाकार असतो. मिरवणुका, डिजिटल फलकांवर गळ्यात सोन्याचे जाडजूड साखळदंड, हातात कडे, अंगावर सफेदपोश स्टार्चचे कपडे, डोळ्यांवर आलिशान गॉगल, कानावर धरलेला किमती मोबाइल अशा पेहरावातील चेहरे झळकतात. याच डिजिटल फलकांवर वरच्या बाजूस ‘आशीर्वाद’ देणाऱ्या सत्ताधारी दिग्गज राजकीय नेत्यांचेही चेहरे दिसतात. समाजकारण, राजकारण आणि गुन्हेगारी अशा सर्वच क्षेत्रांत या चेहऱ्यांचा वावर असतो.

त्यातून यंत्रणेशी थेट लागेबांधे निर्माण होऊन ही तथाकथित समाजसेवक मंडळी लब्धप्रतिष्ठित बनतात. या बुरख्याखाली त्यांचे खासगी सावकारी धंद्यांचे कारनामे झाकले जातात. तर त्यांच्या साम्राज्यात हतबल ठरलेली मंडळी स्वत:च्या जमिनी, घरेदारे, दुकाने, वाहने, सोने आदी तारण म्हणून गहाण ठेवलेल्या वस्तू गमावून बसतात आणि शेवटी स्वत:लाच संपवून टाकतात.

आश्वासक सुरुवात 

सावकारी धंद्यात शासकीय-निमशासकीय यंत्रणेतील भ्रष्ट मंडळींचीही गुंतवणूक असते. पोलीस यंत्रणेतील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या काही महाभागांची ऊठबस अशा खासगी सावकारांकडे असते. अशा काहींना यापूर्वीच्या काही कर्तबगार पोलीस आयुक्तांनी थेट घरचा रस्ता दाखविला आहे. सध्याचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनीही बेकायदा खासगी सावकारी मोडून काढण्यासाठी कठोर भूमिका घेतली आहे. मात्र त्यासाठी संबंधित पीडित व्यक्तींना तक्रारी देण्यासाठी स्वत: निर्भयपणे पुढे यावे लागणार आहे. तक्रारींचा ओघ सुरू झाला आहे. यात पोलीस प्रशासनाविषयीची विश्वासार्हता दिसून येते. ही सुरुवात चांगली आणि आश्वासक मानली जाते.

भेसूर चेहरा

खासगी सावकार सर्व राजकीय पक्षांशी संबंधित आहेत. यातील काहीजण स्वत:ची राजकीय व सामाजिक प्रतिमा उजळविण्यासाठी सार्वजनिक उत्सवांचा आधार घेतात. सामूहिक विवाह सोहळे आयोजित करून स्वत:ला समाजसेवक म्हणवून घेतात.

राजकीय व सामाजिक संघटनांच्या आडून सावकारी धंदा करताना विविध सार्वजनिक उत्सवांमध्ये याच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सावकारांचा पुढाकार असतो.

गळ्यात सोन्याच्या जाडजूड साखळ्या, हातात कडे, अंगावर स्टार्चचे कपडे, डोळ्यांवर किमती गॉगल, कानाशी किमती मोबाइल अशा थाटाच्या प्रतिमांमध्ये ही मंडळी डिजिटल फलकांवर झळकतात.

सावकारीमध्ये गुंतलेल्या याच मंडळींच्या डिजिटल फलकांवर वरच्या बाजूस त्यांना ‘आशीर्वाद’ असलेल्या सत्ताधारी राजकीय नेत्यांचेही चेहरे दिसतात.