आमदार निवास परिसरात विनापरवाना संत्रीविक्रीचा स्टॉल; विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार
विधिमंडळ सचिवालयाची परवानगी न घेता आमदार निवास परिसरात लावलेला संत्रीविक्रीचा स्टॉल हटवला म्हणून संतप्त झालेले भाजपचे आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी कर्मचारी व अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून निवास परिसरात धिंगाणा घातला. दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री घडलेल्या या प्रकरणाची तक्रार विधानसभा अध्यक्षांकडे करण्यात आली असली तरी हे प्रकरण दडपण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. दरम्यान, धिंगाणा घातला नसल्याचा दावा बोंडे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला.
एरवी बांधकाम खात्याच्या अखत्यारीत येणाऱ्या आमदार निवासाचा ताबा अधिवेशन काळात विधिमंडळाकडे जातो. या निवास परिसरात कोणतेही विक्री केंद्र उभारायचे असेल, तर विधिमंडळ सचिवालयाची परवानगी घ्यावी लागते. यंदा दोन संस्थांनी परवानगी घेतलेली आहे. भाजपचे मोर्शीचे आमदार डॉ. बोंडे यांनी परवानगी न घेताच मतदारसंघातील एका शेतकऱ्याला या परिसरात संत्री विक्री केंद्र थाटून दिले. प्रारंभी हा प्रकार कुणाच्याही लक्षात आला नाही. संत्रीविक्रीला परवानगी नाही, हे निवास व्यवस्थापनाच्या लक्षात आल्यावर दोन अधिकाऱ्यांनी हे केंद्र बंद करण्याचे आदेश शेतकऱ्याला दिले. हे कळताच संतप्त झालेले आमदार डॉ. बोंडे १६ डिसेंबरच्या मध्यरात्री निवास परिसरात गेले व त्यांनी तेथे हजर असलेले कर्मचारी व अधिकाऱ्यांना दमदाटी करून शिवीगाळ केली. ‘मी आमदार आहे, याद राखा, एकेकाला पाहून घेईन’, अशी धमकी देत धिंगाणा घातला. यामुळे कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या दिवशी विधिमंडळ सचिवालयाकडे तक्रार केली. काही कर्मचाऱ्यांनी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची भेट घेतली व आमदारांवर कारवाई करावी, असे निवेदन दिले. मात्र, आमदार सत्ताधारी पक्षाचे असल्याने या प्रकरणाची चौकशी सुरू झाली नाही.

‘अधिकारी मस्तवाल, शिवीगाळ मात्र नाही’
यासंदर्भात डॉ. बोंडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला संत्रीविक्री करू न देणारे अधिकारी मस्तवाल आहेत, असा आरोप केला. या विक्री केंद्रासाठी गेल्याच महिन्यात सचिवालयाकडे परवानगी मागितली होती, पण काही कारणाने ती मिळाली नाही. तरीही शेतकऱ्याला मदत करावी म्हणून हे केंद्र सुरू केले, पण अधिकाऱ्यांनी राईचा पर्वत केला. यामुळे मी संतापाच्या भरात अधिकाऱ्यांना दटावले, पण शिवीगाळ केली नाही, असा दावा बोंडेंनी या वेळी केला. या प्रकारानंतर आता या संत्री विक्री केंद्राला परवानगी मिळाली आहे व ते सुरूही झाले आहे, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून असे एखादे केंद्र सुरू केले तर बिघडले कुठे?, असा सवाल करून त्यांनी अधिकाऱ्यांच्या या वृत्तीवर कडक शब्दात टीका केली. दरम्यान, हे प्रकरण वाढू नये यासाठी सत्ताधारी वर्तुळातून निवास व्यवस्थापनावर आता दबाव आणला जात आहे.