नाताळ आणि नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी पहाटे पाच वाजेपर्यंत बार तर मद्यविक्रीची दुकाने मध्यरात्री एक वाजेपर्यंत खुली ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने त्याबाबत आदेश जारी केले आहेत. पार्टी करणाऱ्यांनी आरोग्यासाठी हानीकारक, अवैध आणि निकृष्ट दर्जाचे मद्य सेवन करू नये. परवानाधारक दुकानातूनच मद्य विकत घ्यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

नाताळनिमित्ताने २४ व २५ डिसेंबर आणि ३१ डिसेंबर रोजी मद्यविक्रीची दुकाने रात्री साडेदहाऐवजी मध्यरात्री एक वाजेपर्यंत खुली ठेवण्याची परवानगी सरकारने दिली आहे. तर बार खुले ठेवण्यासाठी मध्यरात्री बारा वाजेपर्यंतची असलेली वेळ पहाटे पाच वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. नाताळ आणि नवीन वर्ष साजरं करण्यासाठी ही सवलत देण्यात आली आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीपासून ते आतापर्यंत उत्पादन शुल्क विभागाने अनेक ठिकाणे छापे टाकून कारवाई करत तीन कोटी रुपयांहून अधिकचे बनावट मद्य जप्त करण्यात आले आहे. बहुतेक प्रकरणांमध्ये ब्रँडेड मद्याच्या नावाने बनावट मद्य विकले जात असल्याचं प्रशासनाच्या नजरेस आलं आहे.

नववर्ष सोहळ्यावर नजर ठेवण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाची नऊ पथके!

नववर्षांचे स्वागत करण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी आयोजित केलेल्या समारंभात मद्याचे वितरण करताना परवाने घेणे आवश्यक आहेत. परवान्याशिवाय असे समारंभ आढळले तर त्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने नऊ पथके नेमली आहेत. याशिवाय अशा समारंभातून भेसळयुक्त मद्याचे वितरण होऊ नये, याची तपासणी करण्याची जबाबदारीही या पथकावर सोपविण्यात आली आहे.

नववर्ष स्वागत समारंभासाठी एक दिवसाचे परवाने उत्पादन शुल्क विभागाने ऑनलाइन उपलब्ध करून दिले आहेत. तसेच प्रत्येक कार्यालयातही असे परवाने देण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. पंचतारांकित हॉटेल्स, तसेच देशी-विदेशी मद्यविक्री करणाऱ्या दुकानदारांनाही अशा पद्धतीने परवाने वितरीत करण्यात आले आहेत. त्यांचीही अचानक तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गोवा तसेच दीव-दमण येथून येणाऱ्या रेल्वे तसेच बसचीही तपासणी केली जाणार आहे.

या वर्षांत उत्पादन शुल्क विभागाने २९९ गुन्हे उघडकीस आणून त्यामध्ये ३०६ आरोपींना अटक केली. हातभट्टी, बनावट देशी-विदेशी मद्य, उच्च प्रतीचे मद्य, दमण, गोवा येथील मद्य असा ५२ लाखांचा साठा हस्तगत केला आहे. प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून ६७ जणांविरुद्ध कारवाई करण्याचे प्रस्ताव राज्याच्या पोलीस दलाला पाठविण्यात आले आहेत.

पोलीस अधीक्षक सी. बी. राजपूत व दोन उपअधीक्षक यांची दोन तर कार्यकारी निरीक्षकांची नऊ भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. नववर्षांच्या समारंभातून मोठय़ा प्रमाणात भेसळयुक्त मद्याचा वापर होण्याची शक्यता आहे. याबाबतची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला द्यावी, असे आवाहन उत्पादन शुल्क आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांनी केले आहे.