News Flash

पंढरपूरमध्ये निवडणुकीनंतर करोना रुग्णसंख्येत वाढ

मार्च महिन्यात संसर्गाचा दर हा ७.०६ टक्के होता. तो एप्रिलमध्ये वाढून १४.९५ टक्क््यांवर गेला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

मंदार लोहोकरे

नुकत्याच झालेल्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीनंतर पंढरपूर तालुक्यातील रुग्णसंख्येत मोठ्या संख्येने वाढ होत असल्याचे दिसत आहे. तालुक्यात मार्च महिन्यात केवळ ७०५ रुग्ण आढळतानाच ही संख्या चालू महिन्यात २६ एप्रिलपर्यंत थेट ३१४६ वर पोहोचली आहे. चाचण्याच्या तुलनेत असलेला संसर्गाचा दर देखील ७.०६ टक्क््यांहून एप्रिलमध्ये एकदम १४ .९५ टक्क््यांवर गेला आहे.

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच करोनाची दुसरी लाट आली. याच काळात पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. या निवडणुकीसाठी या दोन तालुक्यांत असलेले निर्बंध काही प्रमाणात शिथिल केले. यामुळे या तालुक्यांत करोना नियम धाब्यावर बसवत सर्वच पक्षांकडून सभा, मेळाव्यांसारखे गर्दी जमवणारे कार्यक्रम घेण्यात आले. याशिवाय प्रचारासाठी तालुक्याबाहेरून आलेल्या कार्यकर्ते, नेत्यांच्या झुंडीनेही यात भर घातली. दुसरीकडे शिथिल केलेल्या निर्बंधांमुळेही तालुक्यातील संचारावर कुठलेही बंधन न राहिल्याने त्यानेही या रुग्णवाढीला हातभार लावल्याचे बोलले जात आहे.

पंढरपूरमध्ये १ एप्रिल रोजी केवळ ४६ रुग्ण आढळून आले होते. मात्र पुढे १७ एप्रिल रोजीच्या मतदानाअगोदर प्रचार काळापासून यामध्ये वाढ होऊ लागल्याचे दिसून आले. तालुक्यात १५ एप्रिल रोजी – १७१, १६ एप्रिल – २४८, १७ एप्रिल – २१०, २३ एप्रिल रोजी ३०९, २४ एप्रिल – ३१०, २५ एप्रिल -३३३, २६ एप्रिल – २९९ अशी रोज रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. मार्च महिन्यात तालुक्यात केवळ ७०५ रुग्ण आढळले होते. हीच संख्या चालू महिन्यात २६ एप्रिलपर्यंत थेट ३१४६ वर पोहोचली आहे. मार्च महिन्यात संसर्गाचा दर हा ७.०६ टक्के होता. तो एप्रिलमध्ये वाढून १४.९५ टक्क््यांवर गेला आहे.

दरम्यान, वाढत्या रुग्णसंख्येमुळे तालुक्यातील करोना चाचण्यांची संख्या वाढवली आहे. तालुक्यात मार्च महिन्यात एकूण ८९०२ चाचण्या केल्या गेल्या. मात्र त्यात तीन पट वाढ होत चालू महिन्यात २३ अखेरच २१,०१२ करोना चाचण्या झाल्या आहेत. वाढत्या रुग्णसंख्येने प्रशासनही सावध झाले असून खबरदारीचे उपाय म्हणून तातडीने नव्याने रुग्णालय, काळजी केंद्र आदी आरोग्य व्यवस्था उभारली आहे. येथील विठ्ठल मंदिर समितीने देखील आपल्या भक्त निवासात करोना उपचार, विलगीकरण केंद्र करण्याचा प्रस्ताव दिला आहे. दरम्यान, वाढत्या रुग्णसंख्येमुळे पंढरपूरला वाढीव लशींचा पुरवठा करण्याची मागणी आमदार प्रशांत परिचारक यांनी केली आहे.

पंढरपूरमध्ये करोना संशयित रुग्ण मोठ्या संख्येने पुढे येऊ लागल्याने चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. यामुळे रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसत आहे. या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्थाही वाढवली आहे. पात्र नागरिकांनी लसीकरण त्वरित करून घ्यावे. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, करोनाचे नियम पालन करावे.

– डॉ. एकनाथ बोधल, तालुका आरोग्य अधिकारी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 28, 2021 12:11 am

Web Title: increase in corona patients after elections in pandharpur abn 97
Next Stories
1 चंद्रपूर : ”आम्हाला वेतन देणे होत नाही तर मारून टाका” कोविड योद्ध्यांच्या भावनांचा उद्रेक…
2 Coronavirus – राज्यात दिवसभरात ६७ हजार ७५२ रूग्ण करोनामुक्त
3 ICAI CA परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय
Just Now!
X