ग्रामीण भारतीय संस्कृतीचे मनोज्ञ दर्शन रविवारी करवीर नगरीत भारतीय संस्कृती उत्सवाअंतर्गत निघालेल्या भव्य शोभायात्रेत घडले. कलश घेतलेल्या सुवासिनी, सजवलेल्या बलगाडय़ा, ढोल-ताशांचा जल्लोष आणि लेझिमचा ताल, पालखी, चिमुकले संत निवृत्तीनाथ, सोपानदेव, ज्ञानेश्वर आणि मुक्ताई.. शाहूमहाराज.. सावित्रीबाईंची शाळा, वासुदेव, रामलीला, दांडपट्टा, वारकरी संप्रदाय, दार्जििलगचे पारंपरिक नृत्य, कर्नाटकचे हलगी नृत्य, फुगडी, आदिवासी नृत्य, कोळी नृत्य.. आणि अशी विविधतेने नटलेली भारतीय संस्कृती गांधी मदानावर अवतरली होती. भारत विकास संगम भारतीय संस्कृती उत्सवाअंतर्गत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
गेल्या महिनाभरापासून कणेरी गावात भरणाऱ्या भारतीय संस्कृती उत्सवाची तयारी सुरू होती. या उत्सवाचा आरंभ सोमवारी होणार असून रविवारी यानिमित्त शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. रविवारची सकाळ गांधी मदानावर उत्साहानं भारलेली अशीच. सांस्कृतिक परंपरेचे प्रातिनिधिक दर्शन या माध्यमातून झाले. या शोभायात्रेचे उद्घाटन सहकार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी म्हणून महापौर तृप्ती माळवी, तर अध्यक्ष म्हणून खासदार धनंजय महाडिक उपस्थित होते. यावेळी आमदार प्रकाश हाळवणकर, आमदार अमल महाडिक, कणेरी मठाचे काडसिद्धेश्वर महाराज, गुजरातचे पावन सानिध्य मुक्तानंद बापूजी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
माझा गाव-माझा देश, माझा जिल्हा-माझे विश्व या अनुषंगाने स्वावलंबी, स्वाभिमानी परिवार व ग्राम निर्मिती आणि निसर्गाधारित राष्ट्र विकासाच्या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ही शोभायात्रा गांधी मदान, खरी कॉर्नर, बिनखांबी गणेश मंदिर, मिरजकर तिकटी, िबदू चौक, आईसाहेब महाराज पुतळा ते राजर्षी शाहू महाराज पुतळा, दसरा चौक कोल्हापूर या माग्रे काढण्यात आली.
शोभायात्रेमध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या मूर्तीच्या मिरवणुकीबरोबरच ग्रामीण जीवनावरील चित्ररथ, शिमोगा येथील खास धनगरी ढोल, मर्दानी खेळ, नृत्य ५० वेगवेगळ्या प्रकारचे सुमधूर वाद्यवृन्द, कलशासह १००८ सुहासिनी, दान स्वरूपात मिळालेल्या धान्याची वाहने व १०८ सजवलेल्या बलगाडय़ा यांचा समावेश होता. महाराष्ट्रासह परराज्यातून आलेल्या हजारो भाविकांच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक संपन्न झाली.