विद्रोही साहित्य संमेलनातील चर्चेचा सूर
दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर हा विकास नव्हे तर विनाशाचे षड्यंत्र असल्याचा सूर येथे आयोजित ११व्या विद्रोही साहित्य संमेलनातील गटचर्चेतून काढण्यात आला.संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी वामनदादा कर्डक स्मृती शायरी जलसा, खुली गटचर्चा हे कार्यक्रम झाले. गटचर्चेचा समारोप सरोज कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. मुंबई-दिल्ली कॉरीडॉर विकास की विनाश, महात्मा फुले स्मृती दिन हाच खरा शिक्षक दिन, दलित अत्याचार-इंदापूर बावडा ते खैरलांजी, शिक्षणातील मनुवाद आणि मनीवाद, आदिवासी वनहक्काचा कायदा आणि राज्यकर्त्यांची लबाडी, नवीन भूसंपादन कायदा जात वर्ग व सत्ता संघर्ष अशा विविध विषयांवर संमेलनात गटचर्चा रंगली. गटचर्चेनंतर काढण्यात आलेले निष्कर्ष व्यासपीठावरून जाहीर करण्यात आले.
सरोज कांबळे यांनी या वेळी दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर हा विनाशाची नांदी असल्याचा इशारा दिला. पारंपरिक शेती करणाऱ्यांच्या जमिनी बेकायदेशीरपणे कमी दराने खरेदी करायच्या आणि नैसर्गिक मानवी आपत्ती निर्माण करायची. प्रत्यक्षात औद्योगिकीकरणातून शासनाने उत्पादन घ्यायचे. जमीन मालकांना मात्र कायमस्वरूपी अधू बनवायचे, असा हा डाव असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.