साहित्य महामंडळाच्या बैठकीतील निर्णय
साहित्य संमेलनात उद्भवणारे वाद लक्षात घेऊन भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी र्सवकष मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचा निर्णय अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
साहित्य संमेलन आणि वाद हे समीकरण गेल्या काही वर्षांत ठरून गेले होते. यंदाचे संमेलनही त्याला अपवाद ठरले नाही. साहित्य संमेलनाच्या पत्रिकेवरील भगवान परशुरामाचे चित्र आणि परशू या प्रतीकांना संभाजी ब्रिगेडने घेतलेला आक्षेप, संमेलनाच्या मुख्य व्यासपीठाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यास प्रा. पुष्पा भावे यांनी घेतलेली हरकत हे मुद्दे गाजले. संभाजी ब्रिगेडने तर संमेलनाची निमंत्रण पत्रिका मागे न घेतल्यास हे संमेलन उधळून लावण्याचा इशारा दिला होता. या पाश्र्वभूमीवर साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत भविष्यात असे वाद उद्भवू नयेत यासाठी मार्गदर्शक तत्त्वे निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला.
संमेलनाच्या संयोजन समितीने किती निधी जमवावा, संमेलनाच्या प्रवेशद्वारांना आणि मुख्य व्यासपीठाला कोणाचे नाव द्यावे त्याचप्रमाणे निमंत्रणपत्रिकेचे स्वरूप कसे असावे, यासंबंधीच्या तरतुदींचा मार्गदर्शक तत्त्वांमध्ये समावेश असेल.
साहित्य महामंडळाची मार्गदर्शक समिती असली, तरी मार्गदर्शक तत्त्वे अस्तित्वात नव्हती. ती कागदावर आणण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे साहित्य महामंडळाच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.