– मंदार लोहोकरे

आषाढी एकादशी निमित्त लाखो वैष्णवांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेच्या महापूजेचे निमंत्रण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहे. दि. १ जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. या दिवशी पाहटे २ वाजून २० मिनिटांनी शासकीय महापूजा करणार आहेत. तरी या पूजेसाठी आपण सपत्नीक उपस्थित रहावे, असे निमंत्रण श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने मुख्यमंत्री यांना दिल्याची माहिती समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिले आहे.

श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेची आषाढी वारीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तर कार्तिकी वारीला उप-मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा करण्याची प्रथा आहे. या प्रमाणे येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या २ जूनच्या बैठकीत आषाढी एकादशीची श्री विठ्ठल आणि रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर झाला आहे. त्यानुसार मंदिर समितीचे सह-अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महारज औसेकर यांच्या स्वाक्षरीने ईमेलद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महापूजेसाठी सपत्नीक यावे असे निमंत्रण देण्यात आले आहे.

आषाढी  एकादशीच्या पहाटे २ वाजून २० मिनिटांनी ही महापूजा होणार आहे. या वेळी मानाचा वारकरी आणि मुख्यमंत्री यांच्या हस्ते या पूजेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जोशी यांनी दिली आहे. दरम्यान, करोनाच्या पार्श्वभूमीवर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर १७ मार्च पासून भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. येत्या ३० जून पर्यंत मंदिर बंद राहणार आहे. असे असले तरी समितीने आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेच्या निमंत्रणाचा सोपस्कार पूर्ण केला आहे.