सूरजागड येथील लोह उत्खनन पूर्ववत सुरू करण्यासाठी राज्य शासनाने या परिसरात दोडूर, येलचिल, मुरेवाडा, मेंडेर व तुमरकोंडी या पाच सशस्त्र पोलिस दूरक्षेत्रांसह त्यासाठी १४ कोटी ८५ लाखांच्या निधीलाही मंजुरी दिली आहे.

राज्य व केंद्र सरकारने या जिल्ह्य़ातील एटापल्ली, अहेरी व कोरची या तीन तालुक्यात अनेक कंपन्यांना लोह उत्खनन व चुनखडी उत्खननासाठी खाणी दिलेल्या आहेत. यात सूरजागड येथे लॉयड मेटल्ससह गोपानी आयरन १५३.०९ हेक्टर, दमकोंडवाही- गोपानी आयर्न २९५ हेक्टर, जेएसडब्यू इस्पात २०५० हेक्टर, बांडे- सनप्लॅय आयर्न २३६.७५ हेक्टर, नागलमेटा- ग्रेस इंडस्ट्रीज १५६ हेक्टर, गुंटजूर- आधुनिक कोप. लिमि. ४४९.२८ हेक्टर, गुन्उरवाहीमेटा- सत्यनारायण अग्रवाल ५७१ हेक्टर, मल्लेर मेटा- कल्पना अग्रवाल ४६३ हेक्टर, अद्रेलगुडा- सिधावाली इंडस्ट्रीज-३०७ हेक्टर, करमपल्ली- वीरांगना स्टील ६३१ हेक्टर, परहूर- इस्पात इंडस्ट्रीज ४६३ हेक्टर, कोरची तालुका- झेंडेपार अमोलकुमार अग्रवाल १२ हेक्टर, निर्मूलचंद कंपनी २५.६२ हेक्टर, अनुज माईन अँड मिनरल्स १२ हेक्टर, रमेश वाजूरकर कंपनी ८ हेक्टर, मनोजकुमार सरिया ४ हेक्टर, र्भीटोला- विनायक इंडस्ट्रीज २१.३१ हेक्टर, मसेली क्षेत्र- अजंता मिनरल्स ६५ हेक्टर, चमन मेटालिक्स प्रा.लि. २०० हेक्टर, सिंधावाली इस्पात १५० हेक्टर, सूरजागड स्टीड अँड माईन्स ५० हेक्ट, धारीवाल इन्फास्ट्रक्चर ३५३.६० हेक्टर, टाटा स्टील १३१.१० हेक्टर, अहेरी तालुका देवलमारी- वाय अँड एम सिमेंट २५२ हेक्टर, गुजरात सिमेंट २७१ हेक्टर क्षेत्र कवडीमोल भावात देण्यात आले आहे. यासह धानोरा, चामोर्शी, भामरागड या तालुक्यांमध्येही खाणी प्रस्तावित आहेत.  लॉयड मेटल्स प्रकल्पाने सूरजागड येथे उत्खनन सुरू केले होते. मात्र, २३ डिसेंबरला नक्षलवाद्यांनी ८० वाहने जाळल्यामुळे आज तेथे काम बंद आहे. काम सुरू केले, तर कंपनीला त्याची किंमत मोजावी लागेल, असा धमकीवजा इशारा नक्षलवाद्यांनी  दिला आहे. त्यामुळे कंपनीचे काम सध्या बंद असले तरी सूरजागड प्रकल्प लवकर सुरू करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्य शासनाच्या गृह विभागाने तत्परतेने सूरजागड परिसरात आणखी पाच सशस्त्र पोलिस दूरक्षेत्रांना मंजुरी दिली आहे. यात एटापल्ली तालुक्यात दोडूर सशस्त्र दूरक्षेत्र, मुरेवाडा व नेंडेर येथे, तर अहेरी तालुक्यातील येलचिल व भामरागड तालुक्यातील तुमरकोंडी येथेही दूरक्षेत्र सुरू केले जाणार आहे. या एका दूरक्षेत्रासाठी २ कोटी ९७ लाख १४ हजार ४०५ रुपये, तर पाच दूरक्षेत्रांसाठी एकूण १४ कोटी ८५ लाखांची मंजुरी दिली आहे.

उद्यापासून कोरचीत अधिकार संमेलन

लोहखाणींच्या विरोधासाठी ठाकूरदेव यात्रेत ज्या पध्दतीने विरोधाचा ठराव मंजूर करण्यात आला त्याच धर्तीवर कोरची तालुक्यातील झेंडेपार येथे रावपाट गंगाराम घाट वार्षिक उत्सव आणि अधिकार संमेलन ३ ते ५ फेब्रुवारीपर्यंत होत आहे. यात आदिवासी व इतर परंपरागत वनवासींकडून निसर्गपूजा करून जल, जंगल व जमीन नष्ट करणाऱ्या भांडवलदारांचा निषेध केला जाणार आहे. आदिवासींच्या संस्कृती बचावार्थ हे संमेलन होत असून ४ व ५ फेब्रुवारीला यावर चर्चा होणार आहे. यात सहभागी होण्याचे आवाहन इजामसाय काटेंगे, रामदास कल्लो, सुनील होळी, तानसिंग यांनी केले आहे.