आपल्या अरबी समुद्रात थोरियम आहे. केरळच्या समुद्रात सर्वाधिक थोरियम आहे. पण विकसित करण्यासाठी जागतिक वारसा संबोधून अमेरिका भारतावर दबाव आणत आहे. अमेरिकेचे दबावतंत्र भारताला परवडणारे नाही, उद्या पश्चिम घाटच नसेल असे गृहित धरल्यास सर्व भाग वाळंवटासारखाच होईल असे टाटा मूलभूत शिक्षण संस्था मुंबईचे डॉ. आनंद घैसास यांनी सांगितले. मात्र जैतापूर प्रकल्पाची गरज असल्याचे ते म्हणाले. श्री. पंचम खेमराज महाविद्यालयाच्या पाच दिवशीय इन्स्पायर सायन्स कॅम्पच्या मार्गदर्शनासाठी डॉ. आनंद घैसास, डॉ. बी.जी. कुलकर्णी व सागर संशोधक डॉ. शंकर द्वरायस्वामी आले आहेत. त्यावेळी डॉ. घैसास यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
सिंधुदुर्गच्या अरबी समुद्रात थोरियम आहे. तसाच केरळच्या समुद्रात मोठय़ा प्रमाणात थोरियम आहे. भारताला थोरियम विकसित करण्यास अमेरिका दबाव आणत आहे. त्यासाठी जागतिक वारसा असल्याचे सांगत आहे. भारताला आपली वाळू तंत्रज्ञानाने विकसित करण्यास अमेरिकेचा दबाव असणे चुकीचे आहे असे डॉ. घैसास म्हणाले. जैतापूरला अणू ऊर्जा प्रकल्प व्हायला हवा. कोणताही विकास करताना निसर्गाची तोडमोड होणारच आहे. पण कमीत कमी ऱ्हास करून विकास साधला पाहिजे असे डॉ. घैसास व डॉ. बी.जी. कुलकर्णी म्हणाले. अमेरिकेला भारताची प्रगती नको असल्याने ती रोखण्यासाठी अमेरिका आर्थिक दबाव आणणारच आहे असे डॉ. घैसास म्हणाले.
नद्यांतून वीज निर्मिती शक्य नाही. तसे झाल्यास निसर्गावर परिणाम होईल डॉ. माधव गाडगीळ यांचा निसर्ग रक्षणाचा अहवाल आहे. सह्य़ाद्री जगला पाहिजे. जगातील सर्वात जुना खडक बंगलोरमध्ये आहे. जगातील सर्वात जुना डोंगर म्हणजेच सह्य़ाद्री तथा पश्चिम घाट आहे असे डॉ. घैसास म्हणाले.
पृथ्वीचा आस कलला आहे. त्यावर संशोधन सुरू आहे पण त्याचा परिणाम झाल्याचे अद्यापी स्पष्ट झाले नाही. पण हवामान बदलले आहे. तो बदल जाणवतो असेही डॉ. आनंद घैसास म्हणाले.
भारताने उपग्रहाचे तंत्रज्ञान विकसित केले आहेत. त्यामुळे भारताच्या तंत्रज्ञानाच्या रॉकेटमधून आज अंतराळात उपग्रह जात आहेत. हे सर्वानी जाणून घ्यायला हवे असे डॉ. घैसास म्हणाले अमेरिकेच्या नासात भारताचे सर्वाधिक शास्त्रज्ञ आहेत तर कोल्हापूरचे श्रीनिवास कुलकर्णी जागतिक स्तरावरील नासाचे प्रमुख आहेत असे तरुणांनी जाणून घेऊन संशोधनावर भर दिला पाहिजे, असे डॉ. घैसास व डॉ. कुलकर्णी म्हणाले. राजकीय हस्तक्षेपामुळे शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांना मौल्यवान तंत्रज्ञानापासून वंचित रहावे लागत आहे असे ते म्हणाले.
 सागरी जैवविविधतेमुळे पर्यावरणीय बदल होत असतात. पण अद्ययावत तंत्रज्ञानामुळे या बदलांवर मात करता येईल. मात्र निसर्गाच्या बदलांना आधीन राहून देशाच्या हिताचे प्रकल्प व्हावेत असे डॉ. बी. जी. कुलकर्णी म्हणाले.  सागरी संशोधक डॉ. शंकर द्वरयास्वामी यांनी समुद्राच्या कमी जास्त लाटांवर वीज निर्माण होऊ शकते. पण या लाटा विविध ठिकाणी वेगवेगळ्या वेगाने येतात असे ते म्हणाले. समुद्रावर आणखी संशोधन व्हावे असे डॉ. द्वरयास्वामी म्हणाले.