केंद्र सरकारचे २०११-१२चे निर्मलग्राम पुरस्कार जाहीर झाले असून, ६३ ग्रामपंचायतींसह पुरस्कार पटकावणारा जालना जिल्हा देशात पहिल्या क्रमांकावर चमकला आहे. महाराष्ट्रातील पहिल्या पाच ग्रामपंचायतींत मराठवाडय़ाच्या जालना, लातूर व हिंगोली या जिल्ह्य़ांतील ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
२०११-१२साठी जालना जिल्ह्य़ातील १३२ ग्रामपंचायतींचे प्रस्ताव निर्मलग्राम पुरस्कारासाठी पाठविले होते. केंद्र सरकारच्या चार पथकांनी या ग्रामपंचायतींची तपासणी केली. बदनापूर वगळता जिल्ह्य़ाच्या अन्य सातही तालुक्यांतील ग्रामपंचायती पुरस्काराच्या स्पर्धेत होत्या. पैकी जालना तालुक्यातून प्रस्ताव सादर झालेल्या १३पैकी एकही ग्रामपंचायत पुरस्कारास पात्र ठरली नाही. भोकरदन १५, घनसावंगी १३, मंठा ९, परतूर १४, अंबड ८ आणि ४ याप्रमाणे तालुकानिहाय पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायती आहेत.
राज्यातील ३५५ ग्रामपंचायतींना पुरस्कार मिळाला. जालना जिल्ह्य़ातील ७८२पैकी ४२३ ग्रामपंचायतींना यापूर्वीच हा पुरस्कार प्राप्त झाला. २०१२-१३च्या पुरस्कारामुळे ही संख्या आता ४८६ झाली आहे. वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम व वापर, परिसर स्वच्छता, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन शाळा तसेच अंगणवाडी स्वच्छतागृह आदींच्या तपासणीनंतर हे पुरस्कार जाहीर झाले आहेत.
मराठवाडा विभागात औरंगाबाद व उस्मानाबाद जिल्ह्य़ांतील एकाही ग्रामपंचायतीचा पुरस्काराच्या यादीत समावेश नाही. नांदेडमधील एकाही ग्रामपंचायतीस पुरस्कार मिळाला नाही. लातूर ५३, हिंगोली २६ व परभणी १२ याप्रमाणे अन्य जिल्ह्य़ांतील ग्रामपंचायतींनी पुरस्कार मिळवले.