नव्याने स्थापन झालेल्या गुहागर नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे जयदेव मोरे यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे. गेल्या डिसेंबरात ही नगर पंचायत अस्तित्वात आली. त्यानंतर गेल्या महिन्यात झालेल्या पहिल्याच निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने १७ पैकी ११ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले. उरलेल्या ६ जागांवर भाजप-सेना युतीचे उमेदवार विजयी झाले.
जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार गेल्या २६ एप्रिल रोजी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले. राष्ट्रवादीतर्फे मोरे, तर युतीतर्फे गजानन वेल्हाळ यांनी अर्ज दाखल केले. या पदासाठी काल निवडणूक होऊन अपेक्षेनुसार मोरे विजयी झाले. त्यापाठोपाठ झालेल्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्याच स्नेहा वरंडे युतीच्या ज्योती परचुरे यांचा पराभव करून विजयी झाल्या. दोन्ही निवडणुकांसाठी हात उंचावून मतदान घेण्यात आले.
निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्य़ाचे पालकमंत्री भास्कर जाधव यांच्यासह मान्यवरांसमवेत विजयी उमेदवारांची मिरवणूक काढण्यात आली. विजय मेळाव्यात बोलताना जाधव यांनी, पक्षाचा वचननामा डोळ्यासमोर ठेवून सत्ताधाऱ्यांनी गुहागरचा विकास करावा, असे आवाहन केले.
देवरुख नगराध्यक्षपदी नीलम हेगशेटय़े
गुहागर नगर पंचायतीबरोबरच अस्तित्वात आलेल्या आणि निवडणुका झालेल्या देवरुख नगर पंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्ष होण्याचा मान शिवसेनेच्या नीलम हेगशेटय़े यांनी पटकावला, तर भाजपच्या नीलेश भुरवणे यांची उपनगराध्यक्षपदी निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकल्यामुळे या दोन्ही निवडी बिनविरोध झाल्या.