गलवान खोऱ्यात लष्करी संघर्ष उफाळून आल्यानं २० जवान शहीद झाले. या घटनेनंतर देशात संतापाची लाट उमटली होती. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं सर्वपक्षीय बैठक घेतली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनकडून घुसखोरी झाली नसल्याचं स्पष्ट केलं. पंतप्रधानांच्या निवेदनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शहीद झालेल्या जवानांबद्दल पंतप्रधानांना सवाल केला आहे.

प्रत्यक्ष ताबारेषेवर तणाव निवळण्यासाठी भारत आणि चीन यांच्यात लष्करी स्तरावर चर्चा सुरू असतानाच, सोमवारी रात्री गलवान खोऱ्यात अचानक संघर्ष उफाळून आला. यात भारताचे २० जवान शहीद झाले होते. या घटनेनंतर दोन्ही देशांतील संबंध ताणले गेले असून, भारतात संतप्त भावना व्यक्त होत आहे. सीमेवरील तणावावरून विरोधी पक्षांकडून मोदी सरकार कोडींत पकडण्यात आलं. त्यानंतर पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलावत चिनी सैन्यानं घुसखोरी केली नसल्याचं सांगितलं.

पंतप्रधानांनी यासंदर्भात निवेदनही केलं होतं. पंतप्रधानांच्या निवेदनावरून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारला सवाल केला आहे. आव्हाड यांनी ट्विट केलं आहे. “जर कुणी सीमेत घुसलं नाही. कुठल्या पोस्टवर ताबा घेतला नाही, मग २० सैनिकांच्या बलिदानाची जबाबदारी कोणाची?”, असा प्रश्न आव्हाड यांनी पंतप्रधान मोदी यांना विचारला आहे.

काय म्हणाले होते पंतप्रधान?

“देशाकडे कुणीही वाकड्या नजरेनं पाहू शकत नाही. चीनकडून सीमेवर कोणत्याही प्रकारची घुसखोरी झालेली नसून, चीनला उत्तर देण्यास भारतीय लष्कर सक्षम आहे. प्रत्यक्ष ताबा रेषेवर चीनच्या दुष्कृत्यामुळे प्रत्येक देशवासीयाच्या मनावर आघात झाला आहे. चीनने गलवान खोऱ्याच्या भूभागावर ताबा मिळवलेला नाही. अलीकडच्या काळात प्रत्यक्ष ताबा रेषेनजीक पायाभूत सुविधांचा विकास करण्यात आला असून देखरेखीची क्षमताही वाढवण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित करण्यासाठी तिथे पायाभूत सुविधांचा विकास करण्यास महत्त्व दिले गेले. लष्करी दल, लढाऊ विमाने, अत्याधुनिक हेलिकॉप्टर वा क्षेपणास्त्रे असोत, संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या बाबींना अग्रक्रम देण्यात आला आहे. आत्तापर्यंत चिनी सैनिकांना कोणीही आव्हान दिले नव्हेत, त्यांना कधी रोखण्याचा प्रयत्न केला गेला नव्हता, आता जवानांनी चिनी सैनिकांना रोखले, त्यांना विविध भागांमध्ये आव्हान दिले. गरजेनुसार जवान तैनात केले जातील, प्रत्युत्तर दिले जाईल, आकाश, जमीन आणि सागरी अशा कुठल्याही मार्गाचा अवलंब करून लष्कर देशाची सीमा सुरक्षित ठेवेल, असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं होतं.