27 February 2021

News Flash

पायाचे तुकडे पडूनही ८५ वर्षांच्या आजींनी पूर्ण केला किसान लाँग मार्च

त्यांची लढण्याची ताकद पाहून आम्हाला बळ मिळतं

'गेली ४० वर्षे मी शेती करतेय... पण अजूनही जमीन माझ्या नावावर नाही'

उन्हानं मैदानाची जमीन चांगलीच तापली होती. ८५ वर्षांच्या आजी रणरणत्या उन्हांत अणवाणी फिरत होत्या. त्यांचे पाय पोळले होते, पायाची त्वचा सोलवटली होती. आपल्या काठीचा आधार घेत आजी कमरेतून काहीशा वाकून चालत होत्या. एवढ्यात कोणीतरी एक बिस्किटांचा पुडा पुढे केला. ‘अरे मी काय करू या बिस्किटांचं? दात आहेत कुठे मला? आजीनं हसून दाखवलं. खरंच की एकही दात नव्हता. आजीनं तिथलं एक केळ घेतलं आणि आपल्या साडीच्या पदरात बांधलं, नंतर खायला.. अजून लय चालायचं हाय.. पडंल उपयोगी. या आजी होत्या मुळच्या डहाणूच्या. त्यांचं नाव कमली बाबू बाहोटा. किसान मोर्च्यात सहभागी व्हायला त्या डहाणूहून नाशिकला गेल्या आणि तिथून शेकडो किलोमीटरची पायपीट करत त्या मुंबईत आल्या होत्या. या आजींचा उत्साह अगदी माझ्यासारख्या तरुणीला लाजवेल असाच होता.

‘गेली ४० वर्षे मी शेती करतेय… पण अजूनही जमीन माझ्या नावावर नाही…. माझ्या व्यथा सरकार दरबारी पोहोचवण्यासाठी मी पायपीट करत मुंबईत आले…’ ८५ वर्षांच्या आजी सोलवटलेले पाय दाखवत त्यांच्या व्यथा मांडत होत्या. गेल्यावर्षी दिल्लीतल्या किसान मोर्च्यात सहभागी होण्यासाठी त्या गेल्या होत्या अर्थात दिल्लीचा प्रवास दूर होता, तेव्हा आजींनी शेतात पिकवलेलं धान्य विकून जे पैसे आले होते त्यात दिल्ली गाठली होती. ‘यांच्या वयावर अजिबात जाऊ नका, आमच्यात सगळ्यात तरुण त्याच आहेत. त्यांची लढण्याची ताकद पाहून आम्हाला बळ मिळतं. आजींसोबत असलेल्या काही वयस्क महिला आपले पोळलेले, सोलवटलेले पाय अभिमानानं दाखवत सांगत होत्या.

नाशिकहून इतकं अंतर चालून आल्यानंतर मध्यरात्री आराम न करता हजारो मोर्चेकऱ्यांसोबत त्या पहाटे मुंबईत आल्या होत्या. आजींना न राहवून मीच विचारलं, ‘आजी पाय सोलवटले आहेत. शेकडो किलोमीटर तुम्ही चालत आला. तुम्हाला या वयात कसलाच त्रास नाही का झाला? आजी म्हणाल्या पाय तर खूप दुखले, पायात अक्षरश: गोळे पण आले. पण माझ्याकडे या दुखवण्यावर जालीम उपाय आहे. मला कुतूहल आणि आश्चर्य दोन्ही वाटलं. त्यांनी आपली नऊवारी साडी पायाकडून किंचितसही सैल केली. ढोपराभोवती तिची घट्ट गाठ मारली. बघ पोरी पाय दुखायला लागले की हाच उपाय एकदम बेस्ट.. ते पाहून माझ्याकडे खरंच शब्द नव्हते. कदाचित पायचे असे तुकडे पडले असते तर मी पेनकिलर गिळल्या असता, तिथेच हार मानली असती. पण, आजी मात्र थकल्या नाही अजूनही लढायची ताकद आहे माझ्यात पोरी, आजी उठल्या हातात काठी घेतली अन् तितक्याच उर्जेनं आपल्या पारंपारिक आदिवासी नृत्यांवर नाचू लागल्या. पुढच्याच मिनिटांला आजींनी हातात लाल बावटा धरला अन् आपल्या मागण्यांच्या दिशनं मार्गक्रमण करू लागल्या, लाल सागरात त्यांची आकृती काहीशी माझ्या नजरेसमोरून धुसर होत गेली.

प्रतीक्षा चौकेकर

pratiksha.choukekar@loksatta.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2018 2:20 pm

Web Title: kisan long march 85 year old woman fighting for her right
Next Stories
1 शेतकऱ्यांच्या मोर्चामागे नक्षलवाद्यांचा हात: पूनम महाजनांचे वादग्रस्त तर्कट
2 जाणून घ्या काय आहे १९९३च्या मुंबई साखळी स्फोटाच्या खटल्याची स्थिती
3 BLOG : कुमार केतकरांची राज्यसभा आणि काँग्रेस….
Just Now!
X