कोकणची भाग्यरेखा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोकण रेल्वे प्रकल्पाने गेली सुमारे सोळा वष्रे यशस्वी वाटचाल केली असली, तरी बदलत्या काळानुसार विस्ताराच्या विविध योजना प्रलंबित असून उद्या सादर होणाऱ्या रेल्वे अर्थसंकल्पात त्यादृष्टीने ठोस तरतूद होण्याची कोकणवासीयांना प्रतीक्षा आहे.
विक्रमी वेळेत पूर्ण झालेला कोकण रेल्वे प्रकल्प प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने सुरवातीपासूनच अतिशय लोकप्रिय असून, गेल्या तीन वर्षांत या मार्गावरील माल वाहतूकही वाढल्यामुळे प्रकल्प किफायतशीर होऊ लागला आहे. मात्र प्रकल्पासाठी स्वतंत्र कोकण रेल्वे महामंडळ असल्यामुळे रेल्वे खात्याकडून विस्तार योजनांबाबत दुर्लक्ष करण्याचेच धोरण अवलंबण्यात आले आहे. दिल्ली, राजस्थान, गुजरातपासून कर्नाटक ते केरळपर्यंत विविध लांबपल्ल्याच्या रेल्वे गाडय़ा या मार्गावरून धावतात. त्यांची संख्या सातत्याने वाढती असल्यामुळे सध्याचा एक पदरी मार्ग अपुरा पडू लागला आहे. अशा परिस्थितीत वेगवान गाडय़ांसाठी स्थानिक गाडय़ा क्रॉसिंगसाठी थांबवण्याचे प्रकार अनेकदा घडतात. म्हणून संपूर्ण मार्गाच्या दुपदरीकरणाची मागणी गेली काही वष्रे होत आहे. मध्य रेल्वेच्या अखत्यारीतील पनवेल ते रोहा हा सुमारे शंभर किलोमीटर मार्ग दुपदरी आहे. पण तेथून पुढे संपूर्ण मार्ग एक पदरीच असून, त्याच्या दुपदरीकरणासाठी कोकण रेल्वे खात्याने कार्यवाही केलेली नाही.
या मार्गावर रेल्वे टर्मिनसची मागणीही गेली काही वष्रे स्थानिक राजकारणापायी रखडली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात मडुरी येथे हे टर्मिनस व्हावे यासाठी राज्याचे उद्योगमंत्री आग्रही असून, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दीपक केसरकर यांनी मात्र सावंतवाडीसाठी आग्रह धरल्यामुळे योजना लोंबकळत राहिली आहे.
पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात येण्यासाठी कराड ते कोल्हापूर या पट्टय़ातून घाट रस्ते आहेत. त्याबरोबरीने कराड ते चिपळूण, कोल्हापूर-रत्नागिरी, कोल्हापूर-सावंतवाडी या मार्गानी कोकण रेल्वेला जोडण्यासाठी सर्वेक्षणाचे प्रस्ताव वेळोवेळी झाले आहेत. पण त्यापुढे हे विषय सरकलेले नाहीत. या पैकी कोणताही एक मार्ग झाला तरी कोकण पश्चिम महाराष्ट्राशी जोडले जाऊन माल वाहतुकीसाठी अतिशय फायदेशीर होईल. याचबरोबर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्य़ांमधील वापरात असलेली बंदरे कोकण रेल्वे मार्गाशी जोडली गेल्यासही रस्ता वाहतुकीवरील ताण कमी होण्यास लक्षणीय मदत होणार आहे.
या मार्गावरून लांबपल्ल्याच्या आणि वेगवान गाडय़ा मोठय़ा संख्येने धावत असल्या, तरी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील कोकणवासीयांना मर्यादित थांब्यांमुळे त्यांचा उपयोग होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत दादर-सावंतवाडी राज्यराणी एक्स्प्रेसच्या धर्तीवर गाडय़ांची संख्या वाढवण्याची मागणी स्थानिक प्रवासी संघटनांकडून होत आहे.