गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या मालकीच्या जयप्रभा स्टुडिओ मध्ये खासगी वापराचे बांधकाम करण्यास परवानगीचा प्रस्ताव कोल्हापूर महापालिकेच्या सभेत मंगळवारी नामंजूर करण्यात आला. याविषयावरून महापालिकेच्या नगर रचना विभाग आणि वारसा हक्क (हेरिटेज) समितीचा निषेधही नोंदवण्यात आल्याने जयप्रभा स्टुडिओच्या वादाला नवी किनार लागली.

कोल्हापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत जयप्रभा स्टुडीओचा ठराव, भूखंड आरक्षण, पूररेषेचा घोळ, घरफाळा घोटाळा आदी वादग्रस्त विषयावर खडाजंगी उडाली. आभासी सभेच्या अध्यक्षस्थानी निलोफर आजरेकर होत्या. आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांची ही पहिली महासभा होती.

जयप्रभा स्टुडीओत बांधकामास मज्जाव

जयप्रभाची मालकी लता मंगेशकर यांची असल्याचा निकाल न्यायालयाने निकाल दिल्यानंतर त्यांच्यावतीने स्टुडिओच्या जागेच्या विभाजनाचा प्रस्ताव जानेवारी महिन्यात महापालिकेकडे सादर करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर स्टुडीओच्या जागेत खासगी वापराचे बांधकाम करण्यासाठी परवानगी देण्यात येऊ नये. जागेचा चित्रीकरणासाठी वापर करावा,असा सदस्य ठराव विजय सुर्यवंशी यांनी दिला होता. त्यावर नगररचना विभागाने सादर केलेल्या प्रस्तावास विरोध करीत सूर्यवंशी यांनी प्रशासनाचा प्रस्ताव चुकीच्या असून विकसकाच्या बाजूने केला असल्याचा आरोप केला. नगररचना विभाग आणि हेरीटेज समितीचा निषेध करून हा प्रस्ताव नामंजूर करण्यात आल्याने स्टुडीओत बांधकाम करण्याचा मुद्दा मागे पडला आहे.

पाणी मुरते कोठे ?

महापालिका दररोज १८० एमएलडी पाणी उपसा करते, पण ५८ एमएलडीची देयके जमा होतात. मीटर वाचक आणि नळ जोडारी यांनीच पाणी पुरवठा विभाग हातात घेतला असून अनेकांना बेकायदा नळ जोडणी दिली आहेत. मिटर बंद असल्याचे दाखवून व्यावसायिक पाणी वापरतात. त्यांना अधिकारी सामिल आहेत, असा आरोप करीत सदस्यांनी पाणी मुरते कोठे याची पोलखोल केली.

नगर रचना विभागाने भूखंड आरक्षण बाबत ठराव आणले असता हा प्रस्ताव याआधी सभेत मंजूर झाला असून पुन्हा सभागृहासमोर का आणला असा सवाल जयश्री चव्हाण यांनी केला. नियमाप्रमाणे दोन वर्षात कार्यवाही झाली नसल्याने पुन्हा प्रस्ताव दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या उत्तराने सदस्य संतप्त झाले. नगर रचना विभागाच्या कारभारांवर त्यांनी जोरदार टिका करीत पाचही प्रस्ताव मागे घेवून पुन्हा प्रस्ताव सादर करावेत, अशी सूचना करण्यात आली.