रायगड जिल्ह्यत २४ तासांत सरासरी ९३ मिमी पावसाची नोंद

अनियमित पावसामुळे भात शेती अडचणीत आली असतांनाच कोकण किनारपट्टीवर मान्सुन पुन्हा एकदा सक्रीय झाल्याचे दिसून येत आहे. रायगड जिल्ह्यत सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत सरासरी ९३ मिलीमिटर पवसाची नोंद झाली. मुरुड, अलिबाग, उरण, तळा, माणगाव, रोहा आणि सुधागड तालुक्यांना संततधार पावसाने झोडपुन काढले आहे. पावसाच्या पुर्नआगमनाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

जुन महिन्याच्या सुरवातीला कोकणात मॉन्सुनच्या जोरदार सरी कोसळल्या. नंतर मात्र पावसाने ओढ दिली. अनियमित पावसामुळे भात शेती धोक्यात येईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत होता. मात्र शनिवार संध्याकाळपासून कोकण किनारपट्टीवर पावसाने पुन्हा एकदा जोर धरण्यास सुरवात केली आहे. जिल्ह्यात सलग दोन दिवस चांगल्या पावसाची नोंद होते आहे. रविवार पाठपाठ सोमवारी जिल्ह्यात सर्वत्र पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. त्यामुळे सखल भागात पाणी साचणे, विद्युत पुरवठा खंडीत होणे, वृक्ष उन्मळून पडणे यासारख्या घटना घडल्या. संततधार पावसामुळे जिल्ह्यात जनजिवन विस्कळीत झाल्याचे दिसून आले. मुरुड येथे सर्वाधिक २०८ मिमी पावसाची नोंद झाली, तर तळा येथे १४० मिमी आणि अलिबाग येथे १३३ मिमी पाऊस पडला. तर महाड येथे सर्वात कमी पावसाची नोंद झाली येथे ४३ मिमी पाऊस पडला.  रायगड जिल्ह्यात जुन महिन्यात सरासरी ६४३ मिमी पाऊस पडत असतो. यातुलनेत यावर्षी ४७१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हे प्रमाण जुन महिन्याच्या सरासरी पावसाच्या तुलनेत ७३ टक्के येवढे आहे. दोन दिवस सुरु असल्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाआभावी रेंगाळलेली शेतीची काम पुन्हा एकदा सुरु झाली आहे. अनियमित पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभ राहिले होते. पाण्याआभावी भात रोप करपण्याची भिती व्यक्त केली जात होती. मात्र पावसाच्या दमदार आगमनामुळे या रोपांना जिवदान मिळाले आहे. अलिबाग तालुक्यातील चिखली परीसरात शेतकऱ्यांनी भात लावणीलाही सुरवात केली आहे. संततधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पातळीत काही प्रमाणात वाढ झाली होती. मात्र आंबा, कुंडलिका, सावित्री, पाताळगंगा आणि भोगावती या नद्या धोक्याच्या पातळी खालीच वाहत असल्याचे आपत्ती निवारण कक्षाकडून स्पष्ट करण्यात आले. दरम्यान येत्या चार दिवसात कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असून बहुतांश ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळ्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे.