कोकणाला निसर्गाचे वरदान असले तरी येथील समाजात आढळणारी आर्थिक विषमता दूर करण्यासाठी शेतीव्यवस्थेला पूरक उद्योगांना चालना देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ख्यातनाम जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांनी रविवारी केले.
दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर यांनी लिहिलेल्या ‘लाल मातीत रंगलो मी’ या आत्मचरित्राचे प्रकाशन डॉ. चितळे आणि राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष मधू मंगेश कर्णिक यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी बोलताना डॉ. चितळे यांनी देशातील, विशेषत: कोकणातील पारंपरिक लोकजीवन आणि कृषी व्यवहाराचा आढावा घेतला. ते म्हणाले की, ब्रिटिश काळापूर्वी कोकणात सुमारे पाच हजार तलाव होते, अशी माहिती मिळते. पण ब्रिटिशांनी आणलेल्या शासनप्रवण समाज रचनेमुळे ते नष्ट झाले. यापुढील काळात विकेंद्रित स्वरूपाची स्वायत्त समाज रचना निर्माण करण्याची गरज आहे. कोकणचा कॅलिफोर्निया करण्याचे स्वप्न अनेकजण बोलून दाखवतात. पण ही उपमा चुकीची आहे. कारण कॅलिफोर्नियात वाळवंट आहे. त्याऐवजी आपण भात पिकवणाऱ्या, पण केवळ तेवढय़ावर न थांबता विविध पूरक उद्योगांची जोड देणाऱ्या जपानचा आदर्श ठेवायला हवा. समाजाच्या सक्षमतेचे विकेंद्रीकरण करून त्यातील ऊर्जेला चालना देण्याचे कार्य डॉ. कद्रेकर यांच्यासारख्या व्यक्ती करू शकतील.
आत्मचरित्र लेखन ही अतिशय अवघड बाब असते, असे नमूद करून, डॉ. कद्रेकर यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये पारदर्शीपणा, सहृदयता, सुखद अनुभवांचे वाटप करण्याची वृत्ती असल्यामुळे ते हे काम उत्तम प्रकारे पार पाडू शकले, असा अभिप्राय कर्णिक यांनी याप्रसंगी बोलताना दिला, तर हे आत्मचरित्र म्हणजे सच्च्या अनुभवांचे संकलन असल्याचे डॉ. कद्रेकर यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप्ती भाटकर यांनी प्रास्ताविक केले. नमिता कीर यांनी कर्णिकांचा परिचय करून दिला.पुण्याच्या उत्कर्ष प्रकाशनचे सुधाकर जोशी, नगराध्यक्ष मिलिंद कीर, आमदार उदय सामंत, रामचंद्र वाघ, जयू भाटकर इत्यादींनी याप्रसंगी मनोगत व्यक्त केले.    
cap
डॉ. श्रीरंग कद्रेकर लिखित ‘लाल मातीत रंगलो मी’ या आत्मचरित्राच्या प्रकाशन समारंभप्रसंगी डॉ. माधवराव चितळे आणि राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष मधू मंगेश कर्णिक.