भूकंपभीतीच्या छायेखाली डहाणू व तलासरी तालुक्यांत गुरुवारी बारावीची परीक्षा सुरू झाली. विद्यार्थी आणि पालक भीतीच्या अवस्थेत असतानाही परीक्षा केंद्रांवर मात्र सुरक्षा व्यवस्था आणि आपत्कालीन उपाययोजनांचा अभाव आढळून आला आहे.

डहाणू आणि तलासरी तालुक्यांतील सुमारे पावणेसहा हजार विद्यार्थी गुरुवारपासून बारावीच्या परीक्षेला बसले आहेत. मात्र त्यांच्या सुरक्षेकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले असून विद्यर्थ्यांच्या जिवाशी खेळत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. भूकंपप्रवण क्षेत्रात परीक्षा केंद्रांवर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून कोणतीच सोय करण्यात आली नाही. बारावीची परीक्षा सुरू होण्याच्या एक तासाआधी केंद्र संचालकांना दूरध्वनीवरून भूकंपाच्या अनुषंगाने सर्व परीक्षा केंद्रांवर आवश्यक ती दक्षता घेण्याची सूचना देण्यात आल्या. मात्र संबंधित परीक्षा केंद्र व शाळा प्रशासन एवढय़ा कमी वेळेत तंबूची सोय कशी करणार, असा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे भूकंपप्रवण क्षेत्रातील बारावीच्या परीक्षा केंद्राबाबत प्रशासन गंभीर नसल्याचे दिसून आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून परीक्षा केंद्रावर रुग्णवाहिका देणे गरजेचे असतानाही प्रशासन मात्र वरवर मलमपट्टी करत असताना दिसून येत आहे.

बोर्डाच्या नियमानुसार या परीक्षा बंदिस्त वर्गखोल्यांमध्ये घेण्यात येणार असल्या तरीसुद्धा भूकंपाची शक्यता पाहता वर्गाचे दरवाजे खुले ठेवणे आणि इतर सर्व दक्षतेच्या उपाययोजना राबवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या असल्याची माहिती पालघरचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जे. जे. खोत यांनी दिली.

भूकंपाची आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास विद्यार्थ्यांची परीक्षा कुठे घ्यायची हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत प्रशासनाने महाविद्यालयांवर जबाबदारी सोपवून आपले हात वर केले आहेत.

– प्रा. डॉ. भगवान रजपूत, गोदावरी परुळेकर महाविद्यालय

मुलांचे भवितव्य आणि मुलांचा जीव आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. भूकंपाला सामोरे जाण्यासाठी परीक्षा केंद्रांवर कोणतीच उपाययोजना केलेली दिसत नाही. त्यामुळे आमचा जीव टांगणीला लागला आहे.

-रमन वरठा, पालक