करोना संसर्गाचा धोका; प्रवाशांचा रेटा वाढल्याने पोलीस यंत्रणा हतबल

वसई : राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता लोकलमधून केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. असे असतानाही नालासोपारा स्थानक परिसरात शुक्रवारी सकाळच्या सुमारास प्रचंड गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले आहे.

करोनाची रुग्ण संख्येची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहे. यामध्ये गुरुवारी संध्याकाळी ८ वाजल्यापासून टाळेबंदी लागू केली. तसेच करोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी लोकलमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी सर्वसामान्य प्रवाशांचा प्रवास बंद केला असून फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांनाच लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी दिली आहे.  असे स्पष्ट निर्देश असतानाही शुक्रवारी सकाळी ९ च्या सुमारास नालासोपारा येथील स्थानकाच्या बाहेर प्रवाशांची मोठी गर्दी उसळली होती. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता इतर कोणतेही प्रवाशी आत शिरू नये यासाठी प्रवेशद्वार आधीच बंद केले होते. यासह रेल्वे सुरक्षा व रेल्वे पोलिसांचा ही बंदोबस्त त्या ठिकाणी ठेवण्यात आला होता.  आधी ओळख पत्र तपासून त्यानंतरच प्रवाशांना रेल्वे स्थानकात प्रवेश दिला होता. परंतु गर्दी ही अधिकच वाढत असल्याने पोलिसांनाही त्यावर नियंत्रण मिळविणे कठीण जात होते. यामुळे काही काळ स्थानक परिसरात तणावाचे वातावरण होते. या गर्दीमुळे सामाजिक अंतर व इतर सर्व नियमांचा फज्जा उडाल्याचे समोर आले. या गर्दीमुळे करोनाचा संसर्ग अधिक वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

प्रवासासाठी बोगस ओळखपत्राचा वापर?

रेल्वे लोकलमधून सध्या अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना प्रवासाची परवानगी दिली आहे. परंतु त्याचा काहींनी गैरफायदा घेत विविध आस्थापना व इतर अत्यावश्यक सेवा यांचे बनावट ओळखपत्र तयार करून रेल्वेतून प्रवास करीत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. या अशा प्रकारच्या प्रवासामुळे जे खरंच अत्यावश्यक सेवेत कार्यरत आहेत त्यांना ये-जा करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. यासाठी प्रवाशांचे ओळखपत्र हे योग्य आहे की अयोग्य याची पाहणी करावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.