अपुऱ्या पावसामुळे संकटात सापडलेल्या भातपिकासाठी आगामी पंधरवडा निर्णायक ठरणार आहे.
राज्याच्या अन्य भागांप्रमाणेच कोकणातही यंदा मान्सूनच्या पावसाने हूल दिली असून, पावसाळ्याच्या चार महिन्यांपैकी जून महिना वगळता सरासरीपेक्षा मोठय़ा प्रमाणात तूट राहिली आहे. जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांत सर्वात जास्त पाऊस पडतो, असा अनुभव आहे. पण यंदा या दोन्ही महिन्यांमध्ये सरासरीच्या ५० टक्केसुद्धा पाऊस झालेला नाही. गेल्या १ जूनपासून आजअखेर जिल्ह्य़ात एकूण सरासरी १९१२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत तब्बल ३१८८ मिलिमीटर पाऊस पडला होता. पावसाळ्याचा हा शेवटचा महिना असून गेल्या १ सप्टेंबरपासून सोमवारअखेर जिल्ह्य़ात एकूण सरासरी फक्त सुमारे ७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेले काही दिवस तर जिल्ह्य़ात सर्वत्र कडक ऊन पडत आहे. या अभूतपूर्व परिस्थितीमुळे कोकणातील मुख्य पीक असलेले भात अडचणीत सापडले आहे.
या प्रदेशात अल्प मुदत (सुमारे ३ महिने) आणि दीर्घ मुदतीचे (४ महिने) असे दोन प्रकारचे पीक घेतले जाते. त्यापैकी अल्प मुदतीचे पीक सध्या दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे, तर दीर्घ मुदतीचे पीक फुलोऱ्याच्या अवस्थेत असून त्यानंतर लगेच दाणे भरण्याची नैसर्गिक प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित आहे. या दोन्ही टप्प्यांमध्ये पावसाची नितांत गरज असते आणि नेमक्या याच वेळी पावसाने दडी मारली आहे. रत्नागिरी जिल्ह्य़ात अल्प मुदतीच्या भातपिकाचे क्षेत्र सुमारे ३० हजार हेक्टर आहे. अपुऱ्या पावसाचा पहिला फटका या पिकाला बसणार आहे. त्याच्यासाठी येत्या काही दिवसांतच पावसाच्या जोरदार सरी बरसणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास जिल्ह्य़ातील एकूण भातपीक क्षेत्रापैकी ४० टक्के क्षेत्र बाधित होऊ शकते. तसेच दीर्घ मुदतीच्या पिकासाठीही आगामी १५ दिवसांत चांगला पाऊस होणे गरजेचे आहे.
यंदाच्या मोसमात सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल, हा प्रारंभीचा अंदाज वगळता उर्वरित काळातील पावसाबद्दलचे हवामानतज्ज्ञांचे अंदाज बऱ्याच प्रमाणात चुकले आहेत. आता हा पाऊस देशातून परतीच्या वाटेवर आहे. या काळात अनेकदा चांगला पाऊस झाल्याचा अनुभव आहे. त्यावरच कोकणातील शेतकऱ्याच्या आशा केंद्रित झाल्या आहेत. मात्र दुर्दैवाने तसे न झाल्यास भातपिकाला प्रथमच मोठा फटका बसू शकतो.