23 February 2018

News Flash

लातूर जिल्हय़ातील शेतकरीही संकटात

कधी दुष्काळ तर कधी गारपीट हे दुष्टचक्र थांबत नसल्याने शेतकरी पुरता त्रस्त झाला आहे.

प्रदीप नणंदकर, लातूर | Updated: February 13, 2018 3:30 AM

प्रतिनिधिक छायाचित्र

गारपीट होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला होता, पण पीक वाचवायचे कसे, हा प्रश्न सर्वानाच होता. अचानक गारपीट सुरू झाली आणि होत्याचे नव्हते झाले. रब्बी हंगामातील पिकांबरोबरच फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.  लातूर, रेणापूर या दोन तालुक्याला वादळी वाऱ्याचा फटका मोठय़ा प्रमाणावर बसला. तालुक्यातील माटेफळ, खुंटेफळ, भिसेवाघोली व रेणापूर तालुक्यातील बीटरगाव, सुमठाना परिसरात गारांचा पाऊस झाला. औसा तालुक्यातील भादा, रेणापूर तालुक्यातील पानगाव, कारेपूर, कामखेडा, भोकरंबा, अहमदपूर तालुक्यातील किनगाव, उदगीर तालुक्यातील वांजरवाडा परिसरात गारांचा पाऊस झाला.

कधी दुष्काळ तर कधी गारपीट हे दुष्टचक्र थांबत नसल्याने शेतकरी पुरता त्रस्त झाला आहे. रब्बी हंगामातील हरभरा, ज्वारी, गहू या प्रमुख पिकांसह टोमॅटो, मिरची पिकाचे व आंब्याचे नुकसान झाले.  हरभऱ्याचे घाटे पावसाने व गारांनी गळून रानोमाळ झाले. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. आंब्याला या वर्षी चांगला मोहोर आला होता. मात्र, वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने संपूर्ण मोहोर गळून पडल्यामुळे आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे.

First Published on February 13, 2018 3:30 am

Web Title: latur district farmers are in trouble due to unseasonal hailstorm
  1. No Comments.