करोना टाळेबंदीत जोखीम पत्करून गावागावातील आपल्या भावा बहिणींचे रक्षण करणाऱ्या दोन हजारावर आशा ताईंचा रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर पालकमंत्री आशा सुरक्षा सुविधा कार्यक्रमांतर्गत रोख पुरस्कार व सुरक्षा किट देऊन राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्यााचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याचबरोबर पालकमंत्री आशा किरण योजनेची घोषणा त्यांनी यावेळी केली. आशा ताईंना व्यक्तिगत सेवा लाभ देण्याचा राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यात हा पहिलाच प्रयोग आहे.

चंद्रपूर येथील नियोजन भवनात एका भावस्पर्शी कार्यक्रमात आशा ताईंनी पालकमंत्र्यांना राखी बांधल्यानंतर या कार्यक्रमाची सुरूवात झाली. रक्षाबंधनाच्या दिवशी भावाकडून बहिणीला दिलेली ही छोटीशी मदत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केले.

आजच्या कार्यक्रमामध्ये पालकमंत्री आशा सुरक्षा सुविधा कार्यक्रम, पालकमंत्री आशा किरण योजनेचा शुभारंभ करण्यात आला. तसेच, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी खासदार सुरेश उपाख्य बाळू धानोरकर, जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा संध्याताई गुरनुले, आमदार किशोर जोरगेवार, आमदार प्रतिभा धानोरकर, उपाध्यक्ष तथा सभापती रेखाताई कारेकार, जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड, अधिष्ठाता डॉ.राजेंद्र सुरपाम प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमात खासदार सुरेश उपाख्य बाळू धानोरकर यांनी संबोधित करताना करोनाच्या काळामध्ये जोखीम पत्करून काम करून आशाताईंनी एक आदर्श निर्माण केलेला आहे. राज्याच्या परंपरेला साजेशी कामगीरी आशाताई दिवस-रात्र करीत आहेत, असं म्हटलं.

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी रक्षाबंधनानिमित्त आशा स्वयंसेविका यांना विशेष प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून रोख १ हजार १०० रुपये व ४०० रुपयांपर्यंत सुरक्षा किट असे एकूण १ हजार ५०० रुपयांचे बक्षीस देण्यात आले. ही योजना पालकमंत्री आशा रक्षा कवच योजना या नावाने राबविण्याचा आरोग्य विभागाचा मानस आहे. गर्भवती मातांना प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतर सेवा दिल्यास एकत्रित लाभ म्हणून प्रति माता २०० रुपये देण्यात येणार आहे. प्रधानमंत्री खनिज विकास निधी जिल्हा खनिज प्रतिष्ठान मधून ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेची घोषणा रक्षाबंधनाच्या शुभ दिनी करण्यात आली आहे. संचालन जिल्हा अधिसेविका सुरेखा सुत्राळे, तर आभार प्रदर्शन जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ.संदीप गेडाम यांनी केले.