सावंतवाडी : कुत्र्यांच्या पाठलागामुळे घाबरलेला बिबटय़ा नारळाच्या उंच झाडावर चढून बसण्याचा विरळा प्रकार घडला.

कारिवडे गवळीवाडी येथील भालेकर यांनी सकाळी कुत्र्यांना बागेतील नारळाच्या झाडाभोवती उभे राहून भुंकत असल्याचे पाहिले. तेथे जवळ गेले असता झाडावर चढून बसलेल्या बिबटय़ाचे शेपूट दिसत होते.

कुत्र्यांच्या टोळीसमोर बिबटय़ा जीव मुठीत धरून २० फूट उंच नारळाच्या झाडावर चढून बसला असल्याचे समजताच अनेकांनी तेथे गर्दी केली.  दरम्यान या प्रकाराची माहिती मिळाल्यावर वन खात्याचे अधिकारी व कर्मचारीही तेथे पोचले. त्यांनी नागरिकांना व कुत्र्यांना त्या ठिकाणाहून हटवले आणि नारळीच्या झावळ्यांमध्ये लपून बसलेल्या बिबटय़ाला काठीने इशारा दिला. त्यामुळे त्याने वेगाने झाडावरून खाली उतरून जंगलाच्या दिशेने धूम ठोकली.

जंगल भाग नसला तरी वाडय़ा-वस्त्यांमध्ये शिरून बिबटय़ा कुत्र्याला किंवा मांजराला भक्ष्य बनवतो, हा सार्वत्रिक अनुभव आहे. काही वेळा त्यांच्या या प्राण्यांचा पाठलाग करताना बिबटय़ा शेतविहिरीत पडण्याचे प्रकारही अनेकदा घडतात. पण कुत्र्यांनी पाठलाग केल्याने जीव वाचवण्यासाठी बिबटय़ा वीस फूट उंच नारळाच्या झाडावर चढून बसण्याचा हा प्रकार अतिशय विरळाच म्हणावा लागेल.