जगण्याचा संघर्ष कमी झाल्याने जंगल सोडून उसाच्या फडात बिबटय़ा रमला. पण आता पुन्हा भक्ष्य मिळविण्यासाठी त्याची धडपड सुरू आहे. बिबटय़ांना जंगलात सोडले तरीही ते पुन्हा उसाच्या फडात येतात, असा अनुभव येतो.

नगर जिल्ह्य़ात बिबटय़ांचे हल्ले हे नित्याचेच झाले आहे. देवळालीप्रवरा (ता. राहुरी) येथे दोन महिन्यांपूर्वी त्याच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला. तर मागील आठवडय़ात ऊस तोडणी करणाऱ्या शेतमजुरांवर त्याने हल्ला चढविला. बिबटय़ाची ग्रामीण भागात मोठी भीती आहे. गावात बिबटय़ा आला की वनखाते िपजरा लावून त्याला पकडते. जंगलात नेऊन सोडून देते. पूर्वी ताडोबा अभयारण्य किंवा कोयना जलाशय परिसरातील जंगलात नेऊन सोडले जात असे. पण आता तेथे जागाच नाही असे कळविल्याने पकडलेला बिबटय़ा कुठे सोडायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तो पुन्हा त्याच्या मूळ जागी हरिश्चंद्र गड परिसरातील जंगलात नेऊन सोडला जातो. तेथून तो पुन्हा उसाच्या फडात येतो. वनखाते व बिबटय़ा यांच्यातील हा खो-खोचा खेळ सारखा सुरुच आहे.

बिबटय़ाचे वास्तव्य हे केवळ अकोले तालुक्यातील जंगलात होत असे. त्याचे दर्शन झाले की, भंडारदरा धरणाकडे जाणारे पर्यटक सुखावत. पण तेथील जंगलात त्यांना भक्ष्य व पाणी याची टंचाई जाणवू लागल्याने त्याने आपला अधिवास बदलला. गोदावरी, प्रवरा, मुळा या नद्यांच्या कडेला असलेले उसाचे फड त्याला अधिक भावले. २००३ सालापासून त्याचा अधिवास हा हळूहळू सरकत सरकत श्रीरामपूर, राहुरी, राहाता, नेवासे, संगमनेर या तालुक्यांत झाला. जंगलापेक्षा त्याला उसाच्या फडात जगताना संघर्ष कमी करावा लागला. या अधिवासातील पर्यावरणाशी त्याने जुळवून घेतले. त्याला उसात उंदीर, घुशी, रानमांजर, डुक्कर, मुंगूस, ससे हे प्राणी त्याला खाण्यासाठी उपयोगी पडू लागले. तसेच त्याला गावाजवळ शेळ्या, लहान कालवडी, कोंबडय़ा सहज उपलब्ध झाल्या. शिकारीसाठी संघर्ष कमी झाला.

बिबटय़ाची आता तिसरी व चौथी पिढी ही उसाच्या फडातच वाढली. तिला जंगलाच्या अधिवासाची कल्पनाच नाही. माणसालाही त्यांनी जुळवून घेतले. जंगलात असताना जशी त्यांना भीती वाटत होती, तशी आता वाटत नाही. त्यामुळे त्यांना वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी िपजरा लावून पकडून नेऊन जंगलात सोडले तरी ते पुन्हा फडाकडेच येतात. कायद्याच्या धाकामुळे त्याच्या हत्याही कोणी करत नाही. पाळीव प्राण्यांवर त्याने ताव मारला तरी त्याचे पसे शेतकऱ्यांना वनखात्याकडून मिळतात. त्यामुळे बिबटय़ाच्या वाटय़ाला कोणी जात नाही. पण आता वाढत्या लोकसंख्येने काही प्रश्न निर्माण झाले आहेत. बिबटय़ाच्या मादीचे सव्वा ते दीड वर्ष या कालावधीत एक वेत होते. उसाच्या फडात झालेली दोन-तीन पिल्ले तरी हमखास जगतात. पूर्वी जिल्ह्य़ात शंभर बिबटे होते. पण ही संख्या ४००च्या घरात गेल्याचा अंदाज आहे. त्यामुळे त्यांना भक्ष्य शोधताना गावात तसेच वस्त्यांवर जावे लागते. भुकेने व्याकुळ झालेले बिबटे अनेकदा लोकांवर हल्ला करतात. त्यामुळे त्यांना पकडून वनखात्याला अन्यत्र सोडावे लागते, पण आता सोडण्यासाठी जंगलच उरले नाही. त्यात वनखात्याची मोठी कुचंबणा होत आहे.

बिबटय़ाला जंगलातच सोडतो

बिबटय़ाला आता ताडोबा किंवा कोयना परिसरातील जंगलात सोडले जात नाही. मात्र अडीचशे किलोमीटर लांब असलेल्या जंगलातच बिबटय़ांना सोडले जाते. बिबटय़ांची संख्या वाढली आहे. त्यांना सोडण्याची वनविभागाकडे समस्या नाही.

जयलक्ष्मी उपसंचालक, वनविभाग नगर

बिबटय़ा सफारी पार्कचा प्रस्ताव धूळखात

नगर जिल्ह्य़ात बिबटय़ांची संख्या वाढली असून त्यांना सोडण्यासाठी जंगलाचा शोध घ्यावा लागतो. अनेकांचा विरोध होतो, त्यामुळे बेलवंडी (ता. श्रीगोंदे) येथे बिबटय़ा सफारी पार्क सुरू  करण्याचा प्रस्ताव होता. वनखात्याच्या सुमारे १०० हेक्टर जमिनीत जंगल असून त्यामध्ये बिबटय़ांना सोडायचे, त्यांचे जगणे सोपे करायचे, अन् पर्यटनाला चालना द्यायची. त्यातून मिळणाऱ्या पशातून बिबटय़ांचा खर्च भागवायचा अशी संकल्पना होती. पण सरकारकडे निधीच नसल्याने प्रस्ताव धूळ खात पडून आहे. त्यामुळे बिबटय़ाला हक्काचे घर मिळू शकलेले नाही.