एकीकडे महाराष्ट्रावर दुष्काळाचं सावट आहे, पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. अशात आज महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये पाऊस पडला आहे. उन्हाने अंगाची काहिली होत असताना ही काहीशी समाधानाची बाब म्हणावी लागेल. अशात विजेचं रौद्ररूप काय असतं ते सांगणारा फोटोच लोकसत्ता ऑनलाईनच्या हाती आला आहे. शनिवारी संध्याकाळी कोल्हापूरजवळच्या हातकणंगले भागात वीज कोसळतानाचे दृश्य अक्षय पाटील या पुण्यात इंजिनिअरींग करणाऱ्या तरूणाच्या कॅमेरात कैद झालं आहे.

वीज कोसळताना गडगडाट आणि लकलकाटच इतका असतो की त्याचा फोटो घेणं दुरापस्त असतं. त्यामुळे असा फोटो मिळणं हे महाकठीण काम. मात्र अक्षय पाटील या तरूणाला हा फोटो मिळाला आहे. अक्षय हा मूळचा शिरोळ तालुक्यातील लाट गावाचा रहिवासी आहे. शनिवारी संध्याकाळी हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे येथून प्रवास करताना वीज कोसळण्याचा प्रसंग त्याने कॅमेरात कैद केला. अक्षय पाटील इचलकरंजीच्या सहकारी बहुराज्य बँकेचे कार्यकारी अधिकारी अशोक पाटील यांचा मुलगा आहे. कोल्हापुरात या फोटोची चांगलीच चर्चा रंगली आहे.

निसर्ग आपल्याला त्याची विविध रूपं दाखवतो. कधी समुद्रातल्या उंचच उंच लाटा होऊन बरसतो. कधी मुसळधार पावसाचं रौद्ररूप दाखवतो. तर कधी भेगाळलेल्या जमिनीतून दुष्काळाची करूण कहाणी सांगतो. शुक्रवार आणि शनिवारपासूनच काही भागांमध्ये पाऊस पडतो आहे तर काही ठिकाणी ढग जमा झाले आहेत. अशात निसर्गाचं आणि एक रौद्र आणि तितकंच मोहक रूप या विद्युलतेने दाखवलं आहे. हा फोटो आठवणीत साठून रहावा तसाच आहे, जितका भेदक तितकाच मोहक आहे यात शंका नाही.