दोन दिवसाआड काम; गटार सफाईपासून नालेसफाईपर्यंतची कामेही करण्याची वेळ

पालघर: करोनाकाळ हळूहळू सुरू लागला असून खाजगी आस्थापना, कारखाने, बांधकाम व्यवसाय, हॉटेल व्यवसाय आदी व्यवसाय तसेच येथील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. असे असले तरी हाताला काम मिळत नसल्याने हजारो नाका मजुरांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

नाका मजुरी करणाऱ्यांमध्ये बहुतांश परप्रांतीय नागरिक व पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आदिवासी समाजाच्या नागरिकांचा समावेश आहे. टाळेबंदीनंतर बहुतांश परप्रांतीय बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेशमधील झाबुवा या ठिकाणाहून पुन्हा पालघरमध्ये परतले असले तरी या नागरिकांना रोजंदारीच्या कामाचा मोठा प्रश्न भेडसावत आहे. या परप्रांतीय मजुरांसोबत पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मोलमजुरी करणारे आदिवासी समाजातील नागरिक यांनाही रोजंदारीच्या मजुरीसाठी झटावे लागत आहे.

पालघर स्थानकावर तसेच बोईसर स्थानकावर हे नागरिक मोठय़ा प्रमाणात मजुरीच्या शोधासाठी दररोज सकाळी सहा ते नऊ या दरम्यान जमा होत असतात. मात्र बांधकाम व्यावसायिकांसह इतर ठिकाणी रोजंदारीवर काम देणाऱ्या ठेकेदारांनी मर्यादित मजुरांच्या भरवशावर आपले काम सुरू ठेवल्याने त्याचा मोठा फटका या ह्य नाका मजुरांवर बसताना दिसत आहे. या नाका कामगारांना दोन दिवसाआड काम मिळत असल्याने ते हतबल झाले आहेत. त्यामुळे हाताला जे काम मिळेल ते काम ते करीत आहेत. अगदी गटार सफाईपासून नालेसफाईपर्यंतची कामेही करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

पालघर, बोईसर अशा मोठय़ा नागरी वस्ती असलेल्या ठिकाणी बांधकाम व्यवसायिकांनी मोठय़ा प्रमाणात बांधकाम व्यवसाय सुरू केला आहे. याच बरोबरीने इतर व्यवसायांसाठीही रोजंदारीचे मजूर मोठय़ा प्रमाणावर लागत असल्याने त्यांची गरज यांना नाका कामगारांकडून भागवली जाते. मात्र हे व्यवसायिक सद्य:स्थितीत मर्यादित कर्मचाऱ्यांच्या बळावर काम करत असल्याने इतर नाका कामगारांना कामाचा मोठा प्रश्न भेडसावत आहे. त्यामुळे नाका कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत आहे.

ठेकेदारांकडून पिळवणूक

पूर्वी एका जोडीला सुमारे ९०० रुपये मजुरी दिवसाकाठी मिळत होती. मात्र आता करोना काळाचा फायदा उचलत काही ठेकेदार या नाका मजुरांना कमी पैसे देऊन त्यांची पिळवणूक करीत असल्याचे समोर येत आहे. नाका कामगारांसाठी शासनामार्फत कोणतीही योजना नसल्याने पर्यायी हाताला मिळेल ते काम करून दररोजच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यापलीकडे कोणताही पर्याय यांना कामगारांकडे उरला नसल्याने नाका कामगार हतबल झाला आहे. अनेकांनी शासनाकडून नाका कामागारांना मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे.

कामाअभावी मजुरीचे दर घसरले

पालघर, बोईसरमध्ये नाका कामगारांना मोठी मागणी आहे. रोज सुमारे शेकडोची मागणी असलेल्या मजूर वर्गासाठी सध्या काम नसल्याने मिळेल त्या मजुरीवर काम करण्याची तयारी या कामगारांनी दर्शवली आहे. एरवी दर माणशी चारशे ते पाचशे रुपये दिवसाला मजूर घेणारे मजूर आता काम नसल्याने अडीचशे ते तीनशे रुपयात काम करीत असल्याचे दिसून येत आहे. या काळात काम नसल्याने मिळेल त्या कामातून ही तुटपुंजी मजुरी घेऊन आपल्या घरचा उदरनिर्वाह भागवत असल्याचे झाबुवातून आलेले काही मजूर सांगतात.