शहरातील केवळ वैद्यकीय सेवा व औषध दुकाने सुरू राहणार

नगर : सुरुवातीला संचारबंदी व नंतर काही प्रमाणात टाळेबंदी लागू केल्यानंतरही शहरातील करोना संसर्ग रुग्णसंख्या सातत्याने वाढतच असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी निर्बंध अधिकच कडक केले आहेत. आता वैद्यकीय सेवा व दूध विक्री वगळता इतर सर्व सेवा बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. या नव्या निर्बंधाचा कालावधी आज, रविवारी मध्यरात्रीपासून ते १० मेच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहतील. किराणा दुकाने व भाजीपाला विक्रीही बंद राहणार आहे.

दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक झाली. शहरासह जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या सातत्याने वाढतच असल्याचे निदर्शनास आल्याने निर्बंध अधिक कडक करण्याचे व सध्या सुरू असलेल्या सवलती रद्द करण्याच्या सूचना मुश्रीफ यांनी दिल्या होत्या. सकाळी ७ ते ११ या वेळेत गर्दीची झुंबड उडत असल्याने त्याला आवर घालण्याची सूचना त्यांनी केली होती.

या पार्श्वभूमीवर आ. संग्राम जगताप, मनपा आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त यशवंत डांगे, पोलीस उपविभागीय अधिकारी विशाल ढुमे तसेच शहरातील कोतवाली व तोफखाना पोलीस ठाण्यातील निरीक्षकांची बैठक झाली. त्यामध्ये निर्बंध अधिक कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या संदर्भातील आदेश आयुक्तांनी जारी केले.

शहरातील बाजार समिती व परिसरातील भाजीपाला विक्री बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांनी नगर शहरामध्ये आपला शेतीमाल विक्रीत आणू नये अन्यथा मनपाच्या वतीने कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त गोरे यांनी दिला.

बाजार समितीमधील दुकानदार, फळे व भाजीपाला विक्रेत्यांनी आपले व्यवहार शहराबाहेरील नेप्ती उपबाजार समितीमध्ये करावेत, असे आदेश उपविभागीय दंडाधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी जारी केले आहेत.

पोलीस उपाधिक्षक विशाल ढुमे यांनी सांगितले की, नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये. कोणीही जॉगिंगसाठी बाहेर पडू नये, विनाकारण फिरणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.

दुचाकीवर डबलसीटमनाई

दरम्यान दुचाकीवर एकापेक्षा अधिक व्यक्तींना प्रवास करण्यास मनाई करणारा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी काल, शनिवारी जारी केला. हा आदेश आज, रविवारपासून १५ मेपर्यंत लागू राहील. केवळ वैद्यकीय कारणासाठीच दुचाकीवर ‘डबलसीट’ प्रवास करता येणार आहे. याचे उल्लंघन झाल्यास कारवाईचे तसेच या आदेशाचे काटेकोर पालन करण्याचे आदेश त्यांनी पोलीस, आरटीओ व स्थानिक प्राधिकरणास दिले आहेत.

सुरू काय राहणार

* वैद्यकीय सेवा व औषध दुकाने

* अत्यावश्यक सेवेसाठी नियमित वेळेत पेट्रोल पंप

* घरपोच गॅस वितरण

* सर्व बँका

* दूध, दुग्धजन्य पदार्थ, पशूखाद्य विक्री  केवळ ७ ते ११ या वेळेत.

बंद काय राहणार

* किराणा दुकाने व तदनुषंगिक माल खरेदी व विक्री

* भाजीपाला व फळे बाजार

* सर्व खासगी आस्थापना

* अंडी, मटण, चिकन व मासे विक्री बंद.

आडत्यांचा पाठिंबा

भाजीपाला, फळफळावळ आडते संघटनेने आ. जगताप व आयुक्त गोरे यांच्या आदेशानुसार दि.१५ मेपर्यंत फळ व भाजीपाला विभाग पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष अशोक लाटे, उपाध्यक्ष सुनील विधाते व सचिव मोहन गायकवाड यांनी दिली. मात्र उपविभागीय अधिकारी व मनपा आयुक्तांच्या वेगवेगळ्या आदेशान्वये व्यापा?ऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.