रायगड जिल्‍हयात आता लॉकडाउनमध्ये शिथिलता आणण्यात आली असून या काळात जीवनावश्‍यक वस्‍तुंची दुकाने मर्यादित वेळेपुरती सुरू राहणार आहेत. जिल्‍हाधिकारी निधी चौधरी यांनी यासंदर्भात सुधारीत आदेश जाहीर केले आहेत. त्‍यानुसार आता दुध, किराणा सामान, फळे, भाजीपाला, चिकन, मटण, अंडी यांची दुकाने तसेच मासेविक्री सकाळी ६ ते ११ या वेळेत सुरू राहणार आहेत.

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्‍हयात १५ जुलैच्‍या मध्‍यरात्रीपासून २६ जुलैच्‍या मध्यरात्रीपर्यंत लॉकडाउन जाहीर करण्‍यात आला आहे. या कालावधीत किराणा मालासह, फळे, भाजीपाला, चिकन, मटण, मासे यांची दुकाने सुरू ठेवण्‍यास परवानगी देण्‍यात आलेली नव्हती. या सर्व वस्‍तूंची घरपोच सेवेची परवानगी होती.

आणखी वाचा- पिंपरी-चिंचवड : उद्या जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सकाळी ८ ते सायंकाळी ६ पर्यंत राहणार सुरू

तथापी ही दुकाने सुरू ठेवावीत अशी मागणी नागरिकांकडून तसेच व्‍यापाऱ्यांकडून होत होती. दुसरीकडे गटारीनिमित्‍त चिकन-मटण विक्रीची दुकाने रविवारी सुरू ठेवण्‍यास परवानगी द्यावी अशी मागणी विक्रेत्‍यांनी केली होती. या मागणीची दखल घेत ही सर्व दुकाने सकाळी ६ ते ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्‍याची मुभा देण्‍यात आली आहे. पनवेलप्रमाणेच रायगडच्‍या उर्वरीत भागात लॉकडाउनमधून काही अंशी शिथिलता मिळाल्‍याने नागरीक आणि व्‍यापाऱ्यांमध्‍ये समाधानाचे वातावरण आहे.