देशाचे पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदी वारंवार शरद पवार यांच्या भेटीला का जातात ? मागील पाच वर्षांत किमान पाचवेळा त्यांनी व्यक्तीगत पातळीवर पवार यांची भेट घेतली आहे. आमच्याकडे चहा घ्यायला आले तर आम्हीही त्यांचे स्वागतच करू. मात्र नेमके पवार आणि त्यांच्या भेटीमध्ये काय गौडबंगाल आहे ? याचे उत्तर नरेंद्र मोदी आणि शरद पवारांनी द्यायला हवे, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला.

सोलापूर लोकसभा मतदार संघातून ते सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करीत आहेत. तत्पूर्वी, उस्मानाबाद येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी आले असता, त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आपली लढत काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी अजिबात नाही. भाजपा आणि आपल्या लढतीत काँग्रेस-राष्ट्रवादीला तिसर्‍याच ठिकाणी रहावे लागणार आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांबरोबर व्यापार्‍यांनीही आता वंचित आघाडीला प्राधान्याने समर्थन द्यायला हवे, असे आवाहन त्यांनी केले.

नामदेव ढसाळ आणि राजा ढाले यांची जी भाषा आहे, तीच भाषा असदुद्दीन ओवेसी यांचीही आहे. मात्र ओवेसी यांना मिळणारी वागणूक अत्यंत टोकाची आहे. मराठवाडा मु्क्ती संग्रामावरून ओवेसींना धारेवर धरणाऱ्यांनी १५ ऑगस्ट हा काळा दिवस साजरा करणार्‍या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मात्र कधीच प्रश्न विचारला जात नाही. ओवेसींसमोर प्रश्नांची जंत्री उपस्थित करणाऱ्यांनी कधी तरी मोहन भागवत यांच्यासमोरही एखादा प्रश्न उपस्थित करावा, असेही आंबेडकर यांनी सांगितले.

शरद पवारांनी अकोल्यातून लढावे

आपण भाजपाची बी टीम आहोत, असा आरोप करणार्‍या शरद पवारांनी अकोल्यात येवून निवडणूक लढवावी. त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आपण स्वत: घ्यायला तयार आहोत. वंचित आघाडीचा उल्लेख बी-टीम म्हणून करणारे पवार माढा लोकसभेतून आमची धास्ती घेवून का माघारी फिरले याचे उत्तर त्यांनी द्यावे. वंचित आघाडी हा नवीन सशक्त राजकीय पर्याय म्हणून आकाराला येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.