माजी मंत्री बबन घोलप यांचे चिरंजीव योगेश यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या ‘एबी’ फॉर्मसहित दाखल केलेला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र जगताप यांनी अवैध ठरवला. त्यामुळे सदाशिव लोखंडेच सेनेचे उमेदवार ठरले आहेत. मात्र या प्रक्रियेत निवडणूक अधिका-यांपुढे कायद्याचा कीस पाडला जात असतानाच घोलपांवरील दबावासाठी राजकीय घडामोडीही घडत होत्या. अखेर शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी योगेश घोलप यांच्यामागे उभे राहण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्यांनीही अपक्ष म्हणून दाखल केलेला उमेदवारी अर्जही मागे घेण्याचे जाहीर केले व लोखंडे यांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
बुधवारी सेनेच्या वतीने लोखंडे व घोलप या दोघांनीही उमेदवारी अर्ज दाखल करताना आपणच अधिकृत उमेदवार आहोत, असा‘एबी’ फॉर्म दाखल घोलप यांनी सकाळी तर लोखंडे यांनी दुपारी दाखल केला होता. लोखंडे यांनी फॉर्म दाखल करताना समवेत पक्षाचे सचिव सुभाष देसाई यांचे, ‘पूर्वी घोलप यांना दिलेला एबी फॉर्म रद्द समजावा’ असे पत्र दिल्याने हरकत निकाली निघाली. मात्र काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांचे वकील भीमराव काकड यांनी दोघांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरवावे, अशी मागणी करणारा अर्ज दाखल केल्याने कायदेशीर मुद्यांवर युक्तिवाद सायंकाळपर्यंत रंगला.
शिर्डीतील उमेदवारी अर्जाची छाननी मंडप टाकून, ध्वनिक्षेपकावरून जाहीरपणे झाली. त्यास निवडणूक निरीक्षक सुप्रभा दहिया उपस्थित होत्या. नगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी अर्जाची छाननी बंदिस्त दालनात झाली. घोलप यांच्या वतीने वकील आनंदराव जगताप (नाशिक) व वकील चांगदेव डुबे पाटील, लोखंडेंच्या वतीने वकील अजित वाडेकर यांनी काम पाहिले. घोलप यांचा अर्ज अवैध ठरवावा यासाठी आ. अशोक काळे व लोखंडे यांनीही हरकत घेतली होती. दोन एबी फॉर्म दाखल झाल्याने अधिकृत कोण याचा वाद आहे. घोलप व लोखंडे यांनी जातीचे प्रमाणपत्र दाखल केलेले नाही. घोलपांच्या अपक्ष अर्जावर १० सूचकांची नावे नाहीत असे मुद्दे वकील काकड यांनी उपस्थित केले. आपला एबी फॉर्म रद्द करताना पक्षाने कायदेशीर प्रक्रिया पार पाडली नाही, त्यासाठी आपल्याला नोटीस दिली नाही, व्हीप बजावला नाही याकडे वकील जगताप यांनी लक्ष वेधले. लोखंडे यांच्यासंबंधीच्या हरकती वकील वाडेकर यांनी खोडून काढल्या. दुपारी दीड वाजेपर्यंत चाललेला युक्तिवाद पुन्हा तीन वाजता सुरू झाला. तोही सुमारे तासभर रंगला. त्याच वेळी घोलप यांनी तोंडी आपला अर्ज अवैध ठरवला तरी चालेल, असे स्पष्ट केले.
दरम्यान, आवारात अनेक राजकीय घडामोडी घडत होत्या. घोलप यांनी माघार घ्यावी यासाठी सेनेचे दोन्ही जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे व रावसाहेब खेवरे सकाळपासून पाठपुरावा करत त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत होते. घोलपांचा पक्ष सचिव सुभाष देसाई यांच्याशी संपर्क करून देत होते. लोखंडेही त्यासाठी प्रयत्नशील होते. एक वेळ अशी होती की माजी मंत्री बबन घोलप राजी झाले होते, परंतु योगेश राजी होत नव्हते. अखेर दुपारी दोनच्या सुमारास योगेश घोलप यांच्याशी ठाकरे यांनी चर्चा केली व योगेश यांनी माघार घेण्याचे मान्य केले.
नंतर पत्रकारांशी बोलताना योगेश यांनी सांगितले, की अण्णांना (बबन घोलप) दिलेलाच एबी फॉर्म मी दाखल केला होता. ठाकरे यांनीही मला तयारीला लागा असेच सांगितले होते. अखेरच्या क्षणी लोखंडे यांना उमेदवारी देण्यात आली. परंतु आता वाद राहिला नाही. त्यांचा प्रचारही आपण करू. लोखंडे यांनी योगेश यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.
दोघांचे अर्ज अवैध
नगरमधील भाजपचे उमेदवार दिलीप गांधी यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार लक्ष्मण सोनाळे यांनीही हरकत नोंदवली होती. गांधी यांच्याविरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असताना त्याची माहिती अर्जात नमूद केली नाही. मनसुख मिल्कमधील ८१ कोटींची मालमत्ता शेअर्स व डिबेंचर्सच्या स्वरूपात दाखवली आदी मुद्दे उपस्थित करण्यात आले. मात्र निवडणूक अधिका-यांनी ते फेटाळले. नगरमधून अनिल मनोहर ओहोळ (बसप), शिर्डीतून विजयराव खाजेकर (सपा), अशोक गायकवाड (शिवसेना) असे एकूण ३ अर्ज अवैध ठरवण्यात आले. गायकवाड यांचा एक अपक्ष अर्ज वैध आहे.