कोकण विभागातील महाविद्यालयांच्या संघांमधून महाडच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाची ‘आम्ही तुझी लेकरे’ ही एकांकिका ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या महाअंतिम फेरीत पोचली आहे. ग्रामीण भागातील जातिभेद, आर्थिक विषमता, उच्च-नीचता इत्यादीचा खेडेगावातील शाळकरी मुलांच्या बालमनावर होणारा परिणाम आणि त्याबाबतच्या अनुभवांना सामोरे जाताना अखेरीस आलेली सकारात्मक प्रतिक्रिया, या एकांकिकेच्या माध्यमातून मांडण्यात आलेली आहे. मात्र तसे करताना कोठेही भडकपणा येऊ न देण्याची काळजी लेखक-दिग्दर्शकाने घेतली आहे. त्यामुळेच एकांकिका जास्त परिणामकारक ठरली.

२०१४च्या ‘लोकसत्ता लोकांकिके’त सवरेत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार मिळविणाऱ्या मयूर साळवी याने यंदाच्या एकांकिकेतही त्याची लहानशी पण जबरदस्त तणाव निर्माण करणारी भूमिका होती. याही वर्षी खंडय़ाची भूमिका करणाऱ्या स्वप्निलने पुरस्कार पटकावला आहे. मागील स्पध्रेतील अनुभवाचा या वेळी फायदा झाल्याचे या कलाकारांनी नमूद केले. वाणिज्य शाखेच्या दुसऱ्या शाखेत असलेला स्वप्निल शालेय जीवनापासून नाटकांमध्ये काम करीत आला आहे.

‘पुरुषोत्तम’सारख्या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा आणि युवक महोत्सवामध्येही त्याने भाग घेतला आहे. पण अभिनयाबद्दल पुरस्कार प्रथमच मिळाला. त्यामुळे हुरूप वाढला असून याच क्षेत्रात कारकीर्द करण्याचे स्वप्न असल्याचे त्याने सांगितले.

महाअंतिम फेरीत पोचल्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह वाढला आहे. सध्या ते दररोज तीन ते चार वेळा संपूर्ण एकांकिकेचा सराव करतात आणि त्यातील चुकांची नोंद घेऊन सुधारणा केल्या जात आहेत. एकांकिका बसवण्यासाठी येणाऱ्या खर्चामध्ये महाडहून रत्नागिरीत येऊन स्पध्रेत भाग घेण्यासाठी प्रवास आणि नेपथ्याच्या सामानाची वाहतूक यासाठी आलेल्या खर्चाचीही भर पडली. स्पध्रेत भाग घेण्यासाठी महाविद्यालयाने दिलेल्या निधीबरोबरच या चमूमधील सीनिअर विद्यार्थ्यांनीही या खर्चाचा थोडा भार उचलला. त्यामुळे या स्पध्रेत भाग घेणे शक्य झाले. मुंबईत होणाऱ्या महाअंतिम फेरीसाठीही ही आर्थिक जुळवाजुळव करावी लागणार असल्याचे एकांकिकेचा दिग्दर्शक गीतेश खैरे याने सांगितले. पण महाअंतिम फेरीत पोचल्याचा आनंद निश्चितच मोठा असल्याचीही भावना त्याने आवर्जून व्यक्त केली.

एकांकिकेसाठी आवश्यक प्रकाशयोजनेची सुविधा महाविद्यालयात नाही. त्यामुळे प्रत्यक्ष स्पध्रेतील प्रयोगाच्या वेळीच त्याचा वापर होतो. त्याबाबतचा सराव अंदाजानेच करावा लागतो.

गीतेश खरे, दिग्दर्शक