लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषुवक्तृत्व स्पर्धा

ग्रामीण आणि शहरी भागातील स्पर्धकांच्या आशय, विषय आणि शैलीचा अनोखा संगम पाहावयास मिळालेल्या ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ या वक्तृत्व स्पर्धेच्या नाशिक विभागीय प्राथमिक फेरीतून १० स्पर्धकांनी अंतिम फेरीत प्रवेश केला. स्पर्धकांची जिद्द आणि प्रयत्नांचे कौतुक करतानाच परीक्षकांनी उत्तम वक्ता होण्यासाठी आवश्यक असलेले अनेक मुद्दे या वेळी स्पष्ट केले. वक्तृत्व ही कला आत्मसात करायची असेल तर त्यासाठी सरावाला पर्याय नाही. या कलेचे भवितव्य उज्ज्वल असून त्याबाबत कुठलीही चिंता करण्याची गरज नाही, असे मत परीक्षकांनी व्यक्त केले.

येथील कुसुमाग्रज स्मारकात वीणा वर्ल्ड प्रस्तुत व पॉवर्ड बाय ‘बँक ऑफ महाराष्ट्र’, द विश्वेश्वर को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड’, ‘आयसीडी’ (इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट), ‘एमआयटी’ यांच्या सहकार्याने आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची प्राथमिक फेरी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. स्पर्धेत नाशिक शहरासह ग्रामीण भागातील ४० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेसाठी माझ्या मनातील साहित्य संमेलन, व्हॉट्सअप, देशभक्ती, सैराट आणि समाज, माझे खाद्य जीवन हे विषय देण्यात आले होते. स्पर्धेसाठी प्रा. उद्धव अष्टुरकर, प्रा. देवीदास गिरी, प्रा. मेधा सायखेडकर आणि वैशाली शेंडे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. या वेळी स्पर्धकांना मार्गदर्शन करताना शेंडे यांनी स्वत:ची संहिता स्वत: तयार करण्याचा सल्ला दिला. प्रा. सायखेडकर यांनी भाषा कौशल्य, विषयाची व्याप्ती आणि गांभीर्य या त्रिसूत्रीवर काम करण्याची गरज मांडली. प्रा. गिरी यांनी स्पर्धकांच्या तयारीबद्दल समाधान व्यक्त करताना मांडणीत सुधारणा करण्याचा सल्ला दिला. प्रा. अष्टुरकर यांनी वाचनावर भर देण्याचे आवाहन करताना सर्वमान्य लेखकांची पुस्तके किमान नजरेखालून घालावी, असे सांगितले.

स्पर्धकांनी परीक्षकांनी केलेल्या सूचना मार्गदर्शक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. ७  फेब्रुवारी रोजी सायंकाळी कुसुमाग्रज स्मारक येथील विशाखा सभागृहात विभागीय अंतिम फेरी रंगणार आहे.

नाशिक विभागीय प्राथमिक फेरीतील विजेते स्पर्धक

नेहा सावंत (पुरुषोत्तम महाविद्यालय, नाशिकरोड), निशा पगार (औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, चिंचोली), स्वाती पाटील (एस.पी.एच. महाविद्यालय, नामपूर), हर्षद आवटे (मुक्त विद्यापीठ, नाशिक), महेश अहिरे (एम.एस.जी. महाविद्यालय, मालेगाव), प्रसन्ना बच्छाव (एम.एस.जी. महाविद्यालय, मालेगाव), विशाल मर्ढेकर (एमव्हीपी औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय), वृषाली राणे (अमृतवाहिनी महाविद्यालय), आदिती भारती (एमव्हीपी महाविद्यालय, लासलगाव), श्वेता भामरे (के.टी.एच.एम. महाविद्यालय, नाशिक)