परस्परांवर टोकाची टीका आणि स्वबळावर लढण्याची भीमगर्जना करूनही शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने अखेर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी युतीची घोषणा केली. लोकसभेसाठी शिवसेनेला २३ आणि भाजपला २५, तर विधानसभेसाठी मित्रपक्षांच्या जागा सोडून उरलेल्या जागांचे समसमान वाटप, या तत्त्वावर युतीचा निर्णय घेण्यात आला. सध्या काही पक्ष एकत्र येऊन काही आम्हाला विरोध करत आहेत. अशात आम्ही एकत्र यावं ही जनभावना होती तो कौल आम्ही मान्य केला आहे. लोकसभा आणि विधानसभेसाठी आम्ही एकत्र आलो आहोत असं युतीची घोषणा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं होतं. असेच मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही यावेळी बोलताना व्यक्त केले होते. याच पार्श्वभूमीवर ‘लोकसत्ता ऑनलाइन’ने घेतलेल्या जनमत चाचणीमध्ये ज्या जनभावनाचे कारण देत युती केल्याचे दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी सांगितले त्याच जनतेने युती करण्याची भूमिका पटली नसल्याचे सांगितले आहे.

‘लोकसत्ता ऑनलाइन’ने फेसबुक तसेच ट्विटवर घेतलेल्या जनमत चाचणीमध्ये जनभावनेसाठी युती केल्याचा दोन्ही पक्षांनी मांडलेली भूमिका पटते का अशा स्वरुपाचा प्रश्न वाचकांना विचारला होता. या प्रश्नाला फेसबुकवर २ हजार ६०० जणांनी तर ट्विटवर ९६८ जणांनी आपले मत नोंदवले. दोन्ही माध्यमांवरील लोकसत्ताच्या वाचकांनी शिवसेना भाजपाने दिलेले जनभावनेचे कारण पटले नसल्याचे मत नोंदवले आहे.

फेसबुकवर ‘जनभावनेसाठी #BJP आणि #ShivSena यांनी युती केली, अशी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांनी मांडलेली भूमिका पटते का?’, या प्रश्नाला ६८ टक्के वाचकांनी नाही असे उत्तर दिले तर ३२ टक्के वाचकांनी ही भूमिका योग्य वाटत असल्याचे सांगितले. म्हणजेच एकूण मते देणाऱ्या २ हजार ६०० वाचकांपैकी १ हजार ७०० हून अधिक वाचकांनी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंनी मांडलेली युतीमागील भूमिका पटली नसल्याचे मत नोंदवले. या उलट केवळ ८३७ जणांनी फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची भूमिका पटत असल्याचे मत नोंदवले.

या प्रश्नावर अनेकांनी आपली मतेही व्यक्त केली आहेत. ‘लोकसत्ता ऑनलाइन’चे वाचक रविंद्र सुर्वे यांनी, ‘शिवसेनेने युती करून निष्ठावान कार्यकर्त्यांचा उरला सुरला विश्वास ही गमावला’ असल्याचे मत नोंदवले आहे. तर ‘अजिबात नाही लोक भावनेचा विचार केला असता तर शिवसेना मागेच सरकारमधून बाहेर पडली असती,’ असं मत गजानन तारु यांनी नोंदवले आहे. एकीकडे या युतीला विरोध करणारी मते नोंदवण्यात आली असतानाच अनेक वाचकांनी कमेन्टसमधून या युतीचे समर्थनही केले आहे. जर अनेक पक्ष एकत्र येऊन महागठबंधन तयार करु शकतात तर सेना भाजपा युती करु शकते अशी मतेही वाचकांनी मांडली आहेत.

ट्विटवर याच प्रश्नावर ९६८ जणांनी मते दिली त्यापैकी ७४ टक्के म्हणजेच ७१६ जणांनी नाही असे उत्तर देत दोन्ही पक्षांनी दिलेले जनभावनेचे कारण पटले नसल्याचे मत व्यक्त केले आहे. २५२ जणांनी म्हणजेच एकूण मते देणाऱ्यांपैकी २६ टक्के वाचकांनी सेना भाजपा जनभावनेचा आदर ठेऊनच एकत्र आल्याचे वाटत असल्याचे सांगितले आहे.

ट्विटरवरही या पोलला रिप्लाय करुन अनेकांनी आपली मते नोंदवली आहेत. पाहुयात कोण काय म्हणाले आहे या युतीबद्दल बोलताना…

स्वहितासाठी युती केली आहे…

पटत नाही पण

महाठगबंधनापेक्षा युती भली…

अर्थपूर्ण युती

सामान्य लोकांशी कांहीही देणे घेणे नाही

दरम्यान लोकसभेसाठी गेल्या वेळीपेक्षा शिवसेनेला एक जागा जास्त सोडण्यात आली आहे. गेल्यावेळी म्हणजे २०१४ मध्ये भाजपने २६ तर शिवसेनेने २२ जागा लढविल्या होत्या. आता भाजप २५ जागांवरच लढणार आहे. राज्यातील सत्तापदांमध्येही समानतेचा निकष लावण्यात येईल, या सूत्रावर युती झाली आहे.

स्वबळावर निवडणुका लढवण्याचा ठराव जानेवारी २०१८ मध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत केल्यानंतर वर्षभरापासून शिवसेना आणि उद्धव ठाकरे हे सातत्याने भाजपवर, त्यातही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यावर सातत्याने आणि प्रसंगी शेलक्या भाषेतही टीका करत होते. मात्र, या सर्व भूमिका गुंडाळून ठेवत उद्धव ठाकरे युतीला राजी झाल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सायंकाळी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर मुख्यमंत्री फडणवीस, ठाकरे आणि शहा यांनी वरळी येथील पत्रकार परिषदेत युतीची घोषणा करण्यात आली.