परप्रांतातून ऊसतोडणीसाठी सुगाव येथे आलेल्या एका कुटुंबातील सात सदस्यांना मुकादमाने डांबून ठेवल्यानंतर मुकादमाच्या मुलाने व त्याच्या मित्रांनी या कुटुंबातील १७ वर्षीय मुलीवर चार दिवस सामूहिक अत्याचार केले. याबाबतची माहिती ग्रामस्थांना मिळाल्यानंतर तंटामुक्त समितीच्या सदस्यांनी डांबून ठेवलेल्या कुटुंबाची सुटका करून आरोपींना चोप देत पोलिसांच्या हवाली केले. पीडित लोकांना िहदी भाषाही नीटशी येत नसल्याने आपल्यावरील अत्याचाराची कहाणी त्यांना सांगता येत नव्हती. मात्र उपाशी ठेवणे, मुलीवरील सामूहिक अत्याचार, पाणी मागितले तर दारू दिल्याचा, सिगारेटने चटके देण्याचा प्रकार पाहून गावकरीही संतप्त झाले. या प्रकरणी रविवारी बर्दापूर पोलिसांनी पाचजणांना अटक केली असून दोघेजण फरार आहेत. पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी घटनास्थळी तळ ठोकून आहेत.
अंबाजोगाई तालुक्यातील सुगाव येथील ऊसतोडणी मुकादमाचे काम करणाऱ्या महादेव टोपाजी भागवत (वय ५०) याच्याकडे इंदूर (मध्य प्रदेश) येथील सादिक नावाच्या मुकादमाने ऊसतोडणीसाठी दलित आदिवासी असलेल्या दोन टोळ्या पाठवल्या. हातकणंगले येथे एका कारखान्यावर थोडेसे काम केल्यानंतर यातील बहुतांश कामगारांना ऊसतोडणीचे काम माहीत नसल्याने दुसरी टोळी गावाकडे निघून गेली, तर ठाकूर यांच्या कुटुंबातील सात सदस्यांना भागवत यांनी सुगावला आणून डांबून ठेवले. इंदूरच्या मुकादमाला एका कारखान्याकडून उचल घेऊन पसे दिल्यामुळे मजुरांना गावातीलच एका सांस्कृतिक सभागृहात ठेवण्यात आले. डांबलेल्या मजुरांमध्ये दोन लहान मुलांसह दोन महिला व एक १७ वर्षीय मुलगी होती. मुकादमाचा मुलगा विशाल महादेव भागवत (वय २५) याची या मुलीवर नजर गेली. त्याने मित्रांच्या साहाय्याने मुलीला शेतात नेऊन सामूहिक अत्याचार केला. पाणी मागितल्यानंतर दारू देण्यात आली. सिगारेटचे चटके देण्यात आल्याचे पीडित मुलीने जबाबात सांगितले आहे. इतर सदस्यांना उपाशी ठेवणे, मारहाण करण्याचा प्रकार झाला. सलग चार दिवस सुरू असलेल्या या प्रकाराची माहिती गावातील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शरीफ खाँ पटेल यांना मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या मुलाला व काही लोकांना सभागृहाकडे पाठवून वस्तुस्थिती जाणून घेतली. प्रकार खरा असल्याचे कळताच गावकऱ्यांच्या साथीने पीडित कुटुंबाची सुटका करून त्यांना ग्रामपंचायतीत आणण्यात आले. पीडित लोकांनी तोडक्या-मोडक्या िहदीत आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती गावकऱ्यांना सांगितल्यानंतर गावकरीही संतप्त झाले व त्यांनी अत्याचार करणाऱ्या तिघांना बेदम मारहाण करून बर्दापूर पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून महादेव टोपाजी भागवत, पत्नी मंदाकिनी, मुलगा विशाल याच्यासह पांडुरंग राजाभाऊ फरकांडे (वय ३०), अंगद विष्णू िशदे (वय ३०), नानासाहेब छत्रभुज िशदे (वय ४५), सुरेश ित्रबक मस्के (वय ३०) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पाचजणांना अटक करण्यात आली आहे. मंदाकिनी व विशाल हे दोघे फरार आहेत. पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली.