नागपूर : नागपुरातील विधिमंडळ अधिवेशनादरम्यान भाजप आणि त्यांच्या मंत्र्यांची होणारी हेडगेवार स्मृतिमंदिर भेट यावेळी संघानेच टाळल्याची माहिती पुढे आली आहे.

राज्यात भाजपच्या नेतृत्वात सत्ता आल्यापासून नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या वेळी पक्षाचे आमदार, मंत्री आणि खुद्द मुख्यमंत्र्यांनी सुद्धा रेशीमबागेतील संघाच्या हेडगेवार स्मृतिमंदिराला भेट देऊ लागले. येथे येणे त्यांच्यासाठी सक्तीचेच होते. न येणाऱ्यांवर पक्ष नोटीस बजावत असे. यावेळी पावसाळी अधिवेशनही नागपुरात झाले. त्यामुळे यावेळी सुद्धा ही भेट आयोजित करण्यात आली होती.  १० जुलैला मुख्यमंत्र्यांसह भाजपचे सर्व मंत्री आणि आमदार भेटीचा कार्यक्रम निश्चित झाला. तसे  पत्रच भाजप  विधिमंडळाचे गटनेते राज के. पुरोहित यांनी पाठवले. मात्र, मुसळधार पावसाचे कारण देऊन ऐनवेळी स्मृतिमंदिर भेटीचा  कार्यक्रम रद्द करण्यात आला. विशेष म्हणजे १० जुलैला पाऊस नव्हता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार  डॉ. हेडगेवार स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी भाजप आमदारांच्या भेटीला नकार दिला.  शुक्रवार हा अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे या अधिवेशन काळात ही भेट  होणार नाही. हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. याला स्थानिक आमदारांनी त्याला दुजोरा दिला आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून राज्यासह देशभरात विविध प्रकल्प चालतात. या उपक्रमांची माहिती आमदारांना व्हावी, या उद्देशाने ही स्मृतिमंदिर परिसराला भेट दिली जाते. शिवाय संघाचे पदाधिकारी भाजपच्या आमदारांना बौद्धिक देत विविध उपक्रमांची माहिती देत असतात, हे येथे उल्लेखनीय.

राज्यात भाजप सरकार आल्यानंतर नव्या आमदारांना संघाची माहिती व्हावी आणि आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांना अभिवादन करणे हा या भेटीमागचा उद्देश असतो. मात्र, १० जुलैला भेट ठरली असताना त्या दिवशी शहरासह राज्यात मुसळधार पावसाची शक्यता होती आणि शहरात पाऊस होता. त्यामुळे भेटीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. संघाकडून भेटीचे आमंत्रण दिले जात नाही तर पक्षाकडून हा कार्यक्रम ठरवला जातो.

   – राज पुरोहित, मुख्य प्रतोद, भाजप