विखे-पाटील, क्षीरसागर, शेलार, सागर यांच्या समावेशाची शक्यता

चार वर्षांपासून चर्चेत असलेल्या राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर रविवारचा मुहूर्त मिळाला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर होणाऱ्या फडणवीस सरकारच्या या अखेरच्या मंत्रिमंडळ विस्तारात निष्क्रिय आणि वाद्ग्रस्त मंत्र्यांना अर्धचंद्र आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय भाजपने घेतला. शिवसेनेही काही मंत्र्यांच्या खात्यात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आज, रविवारी डझनभर मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.

राज्य मंत्रिमंडळाचा रविवारी विस्तार केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी जाहीर केले. यासंदर्भात ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्याचे फडणवीस यांनी ट्विटरवर जाहीर केले.

मंत्रिमंडळ विस्ताराचे गाजर दाखवत मुख्यमंत्री फडणवीस यांनी अनेक इच्छुकांना मंत्रीपदाच्या आशेवर ठेवले होते. लोकसभा निवडणुकीत राज्यात पक्षाला मिळालेले घवघवीत यश आणि आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला.

या फेरबदलात काही रिक्त जागा भरण्याबरोबरच वादग्रस्त आणि निष्क्रिय मंत्र्यांना घरी बसवण्यात येणार असून पक्षात नव्यानेच आलेल्या काही वजनदार नेत्यांचेही पुनर्वनस केले जाणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील एमपी मिल कंपाऊंड गृहनिर्माण प्रकल्पात लोकायुक्तांनी ठपका ठेवल्याने अडचणीत आलेले गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांना मंत्रिमंडळातून अर्धचंद्र मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच प्रदीर्घ अनुभव असतानाही आपल्या कामाची छाप पाडण्यात मागे पडलेले आणि सध्या रुग्णालयात दाखल असलेले आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा, सामाजिक  न्यायमंत्री राजकुमार बडोले, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रविण पोटे पाटील, आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अंबरिश अत्राम यांना मंत्रिमंडळातून वगळण्याचा निर्णय भाजपने घेतला असून त्यांना राजीनामे देण्यास सांगण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

निष्क्रिय मंत्र्यांना वगळण्याबरोबरच त्या-त्या भागांतील नव्या चेहऱ्यांना संधी देत सामाजिक आणि प्रांतिक समतोल साधण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केल्याचे सांगितले जात आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन कमळ हाती घेणारे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, मुंबई महापालिका आणि आताच्या लोकसभा निवडणुकीत  पक्षाला चांगले यश मिळवून देण्यास हातभार लावणारे आशिष शेलार यांच्यासह योगेश सागर यांना मंत्रिमंळात संधी मिळण्याची शक्यता आहे. विदर्भातून अनिल बोंडे, डॉ. संजय कुटे, प्रा. डॉ. अशोक उईके यांना संधी मिळण्याची शक्यता असून मुख्यमंत्र्यांचे विश्वासू परिणय फुके यांचीही वर्णी लागण्याची शक्यता आहे.

शिवसेनेच्या वतीने अलीकडेच शिवबंधन बांधलेल माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, ‘आर्थिकदृष्टय़ा सक्षम’ अशी ओळख असलेले तानाजी सावंत आणि कोल्हापूरचे राजेश क्षीरसागर यांच्या नावांचीही चर्चा आहे. रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाचे अविनाश महातेकर यांचेही नाव निश्चित झाल्याचे रामदास आठवले यांनीच जाहीर केले.

यांचा समावेश?

काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, भाजपचे मुंबई अध्यक्ष अशिष शेलार, योगेश सागर, अनिल बोंडे, डॉ. संजय कुटे, अतुल सावे, सुरेश खाडे, संजय भेगडे, परिणय फुके, प्रा. डॉ. अशोक उईके यांची, तर शिवसेनेतर्फे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, राजेश क्षीरसागर, तानाजी सावंत आदींची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

उद्घव ठाकरे यांची अनुपस्थिती

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अनुपस्थित असतील. कारण शिवसेनेचे सर्व नवनिर्वाचित खासदार उद्या ठाकरे यांच्यासह अयोध्येत रामलल्लाच्या दर्शनासाठी जाणार आहेत.

यांना अर्धचंद्र?

गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, प्रवीण पोटे पाटील, राजे अंबरिश अत्राम आणि राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना मंत्रिमंडळातून अर्धचंद्र मिळण्याची शक्यता आहे.