ढगाळ हवामानामुळे आंब्याचा मोहोर गळाला; रब्बी पिकांची मळणी धोक्यात, भाजीपाल्यावर कीड

रब्बी पिकांची सुगी अंतिम टप्प्यात आली असताना अचानक राज्यात गुरुवारी सकाळपासून ढगाळ हवामान निर्माण झाल्याने शेतकरी धास्तावला आहे. कोकण, मराठवाडा व विदर्भासह सर्वदूर असेच वातावरण असल्याने आंबा, द्राक्षासह ज्वारी, गहू, हरभरा या रब्बी पिकांची मळणी धोक्यात आली आहे. भाजीपाल्यासह सर्वच बागायती पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढल्याने मोठय़ा हानीची भीती आहे. तसेच आंब्याचा मोहोर गळणे, द्राक्षाचे मणी गळून पडणे, डाळिंबावर रोग येण्यासारखीही संकटे निर्माण झाली आहेत.

होळी पौर्णिमेपासून उन्हाळ्याची चाहूल लागली असतानाच अचानक ढगाळ हवामान निर्माण झाल्याने राज्यभर चिंतेचे सावट पसरले आहे. राज्याच्या काही भागांत नुकत्याच झालेल्या गारपिटीपाठोपाठ आलेल्या या ढगाळ वातावरणामुळे शेतीचा हंगाम धोक्यात आला आहे. या ढगाळ वातावरणाबरोबर काही भागांत हलक्या स्वरुपात पडलेल्या पावसामुळे शेती उत्पादनावरील रोगराईत मोठी भर पडणार असल्याची भीती आहे.

ज्वारी, गहू, हरभरा या रब्बी पिकांची काढणी सध्या अंतिम टप्प्यात आहेत. दुबार पिके घेणाऱ्यांची पिके अद्याप शेतातच आहेत. मळणीसाठी काही शेतकऱ्यांनी ज्वारी, हरभरा आणि गहू काढून रानातच ठेवला असतानाच हे ढगाळ हवामान निर्माण झाल्याने राज्यभर मळणीसाठी धांदल उडाली आहे. पावसाच्या शक्यतेने हातातोंडाला आलेले पीक वाया जाते की काय अशी शंका निर्माण झाली आहे.

भाजीपाल्यावर या हवेमुळे कीड वाढण्याचा धोका असून फुलोऱ्यात असलेल्या आंब्यालाही ढगाळ हवेचा धोका निर्माण झाला आहे. आंब्याचा फुलोरा झडण्याचा तसेच रोगामुळे चिकटा पडण्याचा धोका असल्याने फळगळ होण्याची शक्यता असल्याचेही सांगण्यात आले. येत्या २४ तासांत राज्याच्या काही भागांत पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

बेदाणा उत्पादन धोक्यात

द्राक्षाचा हंगाम ७५ टक्के संपला असला तरी उर्वरित २५ टक्के हंगाम बाकी आहे. यापकी बहुंताश द्राक्षाचा बेदाणा तयार करण्यात येतो. मात्र, वाळवणीसाठी टाकण्यात आलेल्या द्राक्षाचा बेदाणा तयार होण्यात या ढगाळ वातावरणामुळे मोठी अडचण तयार झाली आहे. ढगाळ हवेमुळे बेदाणे ओले राहात आहेत.