जागतिक वारसा स्थळात समाविष्ट होऊ शकणारी कोकणातील कातळशिल्पे दुर्लक्षित

सुहास जोशी, लोकसत्ता

मुंबई : जागतिक वारसास्थळांमध्ये समाविष्ट होऊ शकण्याची क्षमता असणाऱ्या कोकणातील प्राचीन कातळशिल्पांबाबत शासनाची अनास्थाच दिसून येत आहे. गेल्या दोन वर्षांपासून या कातळशिल्पांच्या संवर्धन आणि संरक्षणाची योजना शासनाकडे प्रलंबित असून त्यावर कसली हालचाल झालेली नाही.

रत्नागिरी, लांजा आणि राजापूर या तीन तालुक्यांतील ५७ गावांमध्ये सुमारे १२०० कातळचित्रांची राज्याच्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाने स्थानिकांच्या मदतीने सविस्तर नोंद केली आहे. यापैकी १० ठिकाणांना संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव २०१७ मध्ये, तर त्यानंतर २०१८ मध्ये या दहा ठिकाणांसह आणखीन सात ठिकाणांचा प्रस्ताव मांडण्यात आला.

संवर्धनाच्या कामासाठी सुमारे साडेचार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यामध्ये दगडी कुंपण, प्रेक्षक दर्शनिका, मनोरा, माहिती फलक व निवारा शेड बाबींचा प्रस्ताव आहे. कोकणातील पर्यटनाला चालना मिळावी या उद्देशाने राज्याच्या पर्यटन विभागाने या स्मारकांच्या संवर्धन कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली, मात्र त्यासाठी या ठिकाणांना संरक्षित स्मारक घोषित करावे असे सांगितले असून, त्याशिवाय निधी देता येणार नसल्याचे सूचित केले आहे.

जागतिक वारसा स्थळांमध्ये सांस्कृतिक आणि पर्यावरण अशा मिश्र वर्गवारीत त्याचा समावेश करण्यासाठी प्रयत्न करता येऊ शकतो, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली. अशा मिश्र वर्गवारीतील उदाहरणे तुलनेने कमी आहेत. जागतिक वारसास्थळामध्ये समावेश होण्यापूर्वी संबंधित देशाच्या पुरातत्त्व विभागामार्फत संरक्षित स्मारक म्हणून घोषित करणे गरजेचे असते. जगभरात दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि स्पेन या देशांत कातळशिल्पे आहेत. गोव्यातील कातळशिल्पांना तेथील राज्य पुरातत्त्व विभागाने संरक्षित स्मारकांमध्ये नोंद केली आहे. कोकणातील कातळशिल्पाबाबत राज्याच्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांनी प्रस्ताव शासनास पाठवल्याबद्दल दुजोरा दिला.

डेक्कन कॉलेजच्या डॉ. विश्वास गोगटे यांनी २००३ मध्ये सर्वप्रथम काही कातळशिल्पे प्रकाशात आणली. त्यानंतर कोकण इतिहास परिषदेच्यावतीने काही कातळशिल्पांवर प्रकाश टाकण्यात आला. तर गेल्या काही वर्षांत रत्नागिरीतील निसर्गयात्री ही संस्था अनेक गावांतील कातळशिल्पांचा अभ्यास करत आहे.

लोकसहभागातून संरक्षण

उक्षी येथे ग्रामस्थ आणि रत्नागिरी येथील निसर्गयात्री संस्थेने एकत्रितपणे काम करून पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली तेथील कातळशिल्पे संरक्षित केली आहेत. कातळशिल्पांभोवती संरक्षक भिंत आणि अवलोकन उंचावरून व्यवस्थित होत असल्याने त्यासाठी छोटा मनोरादेखील बांधला आहे. त्यामुळे या गावातील पर्यटनाला चालना मिळाली आहे.

कातळशिल्पे म्हणजे?

अभ्यासानुसार या शिल्पांचा कालावधी हा इ.स.पूर्व सुमारे १० हजार ते इ.स.पूर्व एक हजार वर्षे हा कालावधी नोंदवला आहे. यामध्ये माणसे, प्राणी, मासे अशा असंख्य आकृत्यांचा यामध्ये समावेश आहे. या तीन तालुक्यांतील सडय़ावर ही शिल्पे खोदली आहेत. कशेळी येथील हत्तीचे कातळशिल्प तब्बल १३ मीटर बाय १३ मीटर इतके भव्य आहे. या कातळशिल्पांमध्ये बैल व घोडय़ाचे रेखाटन दिसत नाही, त्यावरून कातळशिल्पांचा कालावधी हा प्रागैतिहासिक काळातील असावा असा निष्कर्ष आहे.