राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्याची माहिती राज्याच्या मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांनी दिली तर काही वेळातच जनसंपर्क विभागाकडून निर्बंध शिथिल केल्याचा संदेश येत आहे. शासनाच्या याच गोंधळावरुन भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी सरकारवर चांगलीच टीका केली आहे. त्याचबरोबर हे सरकार आहे की सर्कस असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट करत भातखळकर म्हणतात, मंत्री घोषणा करतात निर्बंध हटवणार, एका तासाने शासन निर्णय जाहीर होतो, तसं काही नाही हो….हे सरकार आहे की सर्कस?


काही वेळापूर्वीच राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घोषणा केली की, राज्यातला लॉकडाउन पाच टप्प्यांमध्ये हटवण्यात येणार आहेत. वडेट्टीवार यांनी यासंदर्भातली संपूर्ण माहिती पत्रकार परिषदेत सादर केली. मात्र, त्यानंतर काही वेळातच सरकारच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आलं की, राज्यातले कोणतेही निर्बंध शिथिल झालेले नाहीत. नव्या नियमांचा प्रस्ताव अद्याप विचाराधीन आहे. त्यामुळे आता लॉकडाउन की अनलॉक असा संभ्रम निर्माण झाला आहे. यावरुनच आता विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे.

आणखी वाचा- Maharashtra Unlock : राज्यात ५ टप्प्यांमध्ये होणार अनलॉक; विजय वडेट्टीवारांची मोठी घोषणा!

भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांनीही सरकारवर सडकून टीका केली आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, अंधेर नगरी, चौपट राजा अशी राज्याची अवस्था महाविकास आघाडी सरकार करत आहे. कुणाचा कुणाशी ताळमेळ नाही. विजय वडेट्टीवार पत्रकार परिषद घेऊन लॉकडाउन केल्याची घोषणा करतात, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठकीत निर्णय झाल्याचे सांगतात. काही वेळानंतर सरकारी प्रेसनोट येते की अनलॉकचा प्रस्ताव आहे, निर्णय नाही.