शिक्षणात देशात महाराष्ट्र पाचवा असून पटनोंदणी व उपस्थिती अहवालातही तो अग्रेसर असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी येथे दिली. अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त मंडळ, पश्चिम महाराष्ट्र व नाशिक जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ यांच्यातर्फे शनिवारी येथे आयोजित ५३ व्या राज्यव्यापी शैक्षणिक संमेलनाचे उद्घाटन दर्डा यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
दादासाहेब गायकवाड सभागृहात झालेल्या या उद्घाटन सोहळ्यास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री छगन भुजबळ, संमेलनाचे अध्यक्ष रावसाहेब आवारी आदी उपस्थित होते. भावी पिढी घडवायची असेल तर ती संगणकाद्वारे घडत नाही. विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम शिक्षकच करत असतात, असेही दर्डा यांनी नमूद केले. मुख्याध्यापक हा सकारात्मक विचार करणारा, मेहनती, उत्तम नेतृत्व करणारा असायला हवा, असेही ते म्हणाले. महसूलमंत्री थोरात यांनी राष्ट्र घडविण्याचे काम शिक्षक करत असल्याचे सांगितले. शाळेत मुख्याध्यापक हा महत्त्वाचा घटक आहे. शाळेचा तो कप्तान असतो. मुख्याध्यापकाने शाळेत आपली आदरयुक्त भीती निर्माण केली पाहिजे, अशी अपेक्षा थोरात यांनी व्यक्त केली.
संस्कारित समाज घडविण्याचे काम शिक्षकांचे असल्याचे पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले. शिक्षणाचा अधिकार प्रत्येकाला मिळाला पाहिजे. राष्ट्राचा शिक्षणाचा पाया मजबूत असल्याशिवाय देश प्रगती करू शकत नाही. गुन्हेगारी, स्त्रियांवरील अत्याचार हे प्रकार थांबविण्यासाठी संस्कारित समाज घडविण्याचे काम शिक्षकांना करावे लागणार आहे. मराठी शाळेतील शिक्षकांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.