‘तू मोठी होऊन साहेब हो’… १० वर्षांचा पवन शाळेत येताना- जाताना त्याची ताई दीपालीला हेच सांगायचा…पण नियतीचा खेळ अजबच.. पवनला इतक्या कमी वयातच मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रासले आणि मार्चमध्ये त्याने या जगाचा निरोप घेतला. भावाच्या अकाली जाण्याने दीपाली पाटीलला धक्का बसला खरा पण भावाचे स्वप्न पूर्ण करण्याच्या इराद्याने तिने स्वत: ला सावरले आणि ती दहावीच्या परीक्षेला गेली. विशेष म्हणजे दीपालीने या मानसिक धक्क्याला सामोरे जाताना दिलेल्या परीक्षेत चांगले यश मिळवले आहे. दीपालीला ६८ टक्के मिळाले असून गावात तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

धुळे तालुक्यातील धनुर येथे दीपाली पाटील आणि तिची आई राहते. दीपालीची आई अल्पभूधारक असून उदरनिर्वाहासाठी त्या रोजंदारीवरही काम करतात. दीपालीच्या वडिलांचे निधन झाले असून पवन हा तिचा लहानभाऊ होता. दररोज दीपाली आणि पवन एकत्रच शाळेत जायचे. पवनला चांगलं शिक्षण मिळावं असे दीपालीला वाटायचे. तर दहावीत शिकणाऱ्या ताईने साहेब व्हावं असे पवनला वाटाचये. पण दीपालीच्या नशिबी भावाचा विरह देखील होता.

मार्चमध्ये दहावीच्या परीक्षा तोंडावर असताना दीपालीला लहान भावाला मुत्रपिंडाच्या आजाराने ग्रासल्याचे समजले. यानंतरही दीपाली आणि तिच्या आईने पवनला वाचवण्यासाठी प्रयत्न केले. पण त्यांच्या प्रयत्न अपयशी ठरले. पवनने या जगाचा निरोप घेतला होता.

पवनचा मृत्यू झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी दीपालीचा भूगोलचा पेपर होता. भावावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर दीपालीने स्वत:ला सावरले आणि तिने दहावीची परीक्षा दिली. शुक्रवारी दहावीचा निकाल जाहीर झाला असून यात दीपालीला ६८ टक्के मिळाले आहे. निकाल पाहिल्यानंतरही दीपालीच्या डोळ्यात भावाच्या आठवणीने दाटून अश्रू आले. कठीण परिस्थितीवर मात करत दीपालीनं मिऴवलेलं यश कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया तिच्या क्लासचे शिक्षक जगदीश पाटील यांनी दिली आहे.