राज्यात दुष्काळ जाहीर झालेल्या १५१ तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठी मदत जाहीर केली आहे. दोन टप्प्यात शेतकऱ्यांना ही मदत दिली जाणार आहे. हंगामी पिकांसाठी पहिला हप्ता ६८०० रूपये दिला जाणार आहे. फळबागांसाठी विक्रमी मदत जाहीर झाली असून २ हेक्टरपर्यंत १८ हजारांची मदत दिली जाईल. ३० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्यांना ही मदत दिली जाईल. ही मदत तातडीने दिली जाणार आहे. दुष्काळ जाहीर केला पण मदत अद्यापही न दिल्यामुळे राज्य सरकारवर मोठ्याप्रमाणात टीका होत होती. राज्य सरकारने केंद्राकडे मदतही मागितली होती. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणतीही मदत जाहीर केली नव्हती. अखेर राज्य सरकारनेच पाऊल उचलत ही मदत जाहीर केली.

दोन टप्प्यात २९०० कोटींची मदत केली जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते आधारशी लिंक आहेत त्यांच्या खात्यात थेट मदत जमा होईल, असेही सांगण्यात येते. ज्या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या निवडणुका सुरू आहेत. त्यांना लगेच मदत मिळणार नाही. अशा ठिकाणी निवडणुकीनंतर मदत दिली जाईल. यापूर्वी अशा पद्धतीची आणि एवढी मोठी मदत कधी जाहीर झाली नव्हती, असेही सांगण्यात येते.