मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र त्याआधी करोना रुग्णसंख्या वाढत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीरपण लॉकडाउनचा इशारा दिला होता. पण लॉकडाउनला महाविकास आघाडीमधील इतर मित्रपक्षांचा तसंच काही उद्योजकांनी विरोध दर्शवला होता. विरोध दर्शवणाऱ्यांमध्ये महिंद्रा ग्रुपचे संचालक आनंद महिंद्रा यांचाही समावेश होता. उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संबोधित करताना आनंद महिंद्रांचा उल्लेख न करता टोला लगावला होता. पण यानंतरही आनंद महिंद्रा यांनी उद्धव ठाकरेंचे आभार मानले आहेत.

आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत लॉकडाउन जाहीर न केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आभार मानले आहेत. आनंद महिंद्रा यांनी ट्विटमध्ये मुख्यमंत्री कार्यालयाला टॅग केलं आहे.

आनंद महिंद्रांनी आभार मानताना काय म्हटलं आहे –
लॉकडाउन लागू न केल्याबद्दल आभार मुख्यमंत्री कार्यालय…सतत संघर्ष करणाऱ्या छोट्या दुकानदारांसाठी मला वाईट वाटत राहतं. आता या करोनासंबंधित नियमांचं पालन करणं आपलं कर्तव्य आहे जेणेकरुन ही बंधनं लवकरात लवकर किंवा त्यानंतर मागे घेतली जातील.

आनंद महिंद्रांनी आधी काय केलं होतं ट्विट?
आनंद महिंद्रा यांनी काही दिवसांपूर्वी एक ट्वीट करून लॉकडाऊनवर प्रश्न उपस्थित केला होता. “उद्धवजी, समस्या ही आहे की लॉकडाऊनमुळे सर्वाधिक नुकसान हे गरीब, स्थलांतरित मजूर आणि छोट्या उद्योजकांचं होतं. मूळ लॉकडाऊन हे हॉस्पिटल किंवा इतर आरोग्य व्यवस्था उभारण्यासाठी वेळ मिळावा यासाठी लागू करण्यात आले होते. आपल्या आरोग्य व्यवस्थेवर लक्ष केंद्रीत करूयात आणि मृतांचं प्रमाण कमी करण्यावर काम करूयात”, असं ट्विट आनंद महिंद्रा यांनी केलं होतं.

anand mahindra tweet

उद्धव ठाकरेंनी काय टोला लगावला होता –
“मी त्यांचं नाव घेणार नाही, पण एका उद्योगपतीने सांगितलं की लॉकडाऊन करायचाय, तर आरोग्य सुविधा वाढवा. ते आपण करतोच आहोत. गेल्या वर्षभरात आपण आरोग्य सुविधा वाढवली, अजूनही वाढवतो आहोत. पण हे जे काही आपल्याला सल्ले देत आहेत, ज्या उद्योगपतींनी आरोग्य सुविधा वाढवायला सांगितलं, त्यांना मी हात जोडून सांगू इच्छितो, की आरोग्य सुविधा आपण वाढवतोच. पण कृपा करून रोज मला किमान ५० डॉक्टर, नर्सेस, कर्मचारी यांची महाराष्ट्रात पुरवठा होईल, अशी काहीतरी सोय करा. कारण नुसरं फर्निचरचं दुकान म्हणजे हॉस्पिटल नाहीत”, असं मुख्यमंत्री म्हणाले होते.