खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत खासदार, आमदारांची नाराजी

चंद्रपूर : एक वर्षे लोटूनही शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई मिळाली नाही याबद्दल खासदार, आमदार यांनी खरीप हंगामाच्या बैठकीत नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांसाठी बी-बियाणे व खतांचा विहित वेळेत पुरवठा होईल, बियाणे व खतांची कमतरता भासणार नाही तसेच शेतकऱ्यांना अधिकृत खते व बी-बियाणे मिळावे यासाठी कृषी विभागाने दक्षता घ्यावी, असे निर्देश आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.

खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली झूम दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली होती. यावेळी खासदार बाळू धानोरकर, जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरनुले, आ. सुधीर मुनगंटीवार, आ. रामदास आंबटकर, आ. अभिजित वंजारी, आ. सुभाष धोटे, आ. किशोर जोरगेवार, आ. प्रतिभा धानोरकर, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले,  उपस्थित होते. खा. धानोरकर यांनी वरोरा- भद्रावती तालुक्यात मागील वर्षी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते, त्यात त्यांचे मोठे नुकसान झाले. वर्ष लोटूनही त्यांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. ती त्वरित देण्याची कार्यवाही करावी तसेच बियाण्यांची किंमत एकच कशी निर्धारित ठेवता येईल याकडे लक्ष देण्याच्या सूचना कृषी विभागाला दिल्या.

खताचे भाव वाढले असल्यास त्याची माहिती सादर करावी तसे प्रसिद्धीपत्रक काढावे. एखादी कंपनी अथवा कृषी निविष्ठा केंद्र वाढीव दरात खत विकत असल्यास त्याची माहिती द्यावी. त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. तसेच खताचा जुना साठा संपत नाही तोपर्यंत नव्याची विक्री करू नये अशा स्पष्ट सूचनाही दिल्या. आधार कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खत उपलब्ध करून देण्यात येईल. इंटरनेट सुविधा या समस्येवर सदर कंपन्यांशी येत्या काही दिवसात बैठक घेणार असल्याचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यावेळी म्हणाले.