अतिरिक्त व सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावली

परभणी : जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथील एका शेतमजुराच्या पाच वर्षीय मुलीचे अपहरण केल्यानंतर तिच्यावर अत्याचार करून तिचा खून केला व प्रेत विहिरीत फेकून दिल्याच्या आरोपावरून विष्णू मदन गोरे (रा. शेळगाव, ता. सोनपेठ) यास मंगळवारी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जी. इनामदार यांनी मृत्युदंडाची शिक्षा सुनावली.

परभणी जिल्ह्यातील शेळगाव येथे ऑक्टोबर २०१६ रोजी प्रभाकर शामराव गायवळ यांनी सोनपेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार मुलीचे आई-वडील शेतात सोयाबीन काढण्यासाठी सकाळी साडेआठ वाजता मजुरीसाठी गेल्यानंतर पाच वर्षीय मुलगी घरातून गायब झाली होती. या फिर्यादीनुसार पोलीस तपास सुरू झाला. दरम्यान, ३१ ऑक्टोबर २०१६ रोजी एका शेतातील विहिरीत मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता एका पोत्यात खून करून गुंडाळलेला मृतदेह आढळून आला. त्यात पाच वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला.

मृतदेहाच्या वैद्यकीय अहवालानुसार संबंधित मुलीवर अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले. तसेच घटनास्थळी आरोपीच्या लुंगीचा तुकडा व नायलॉनची दोरी आढळून आली. या प्रकरणी तपास अधिकारी तथा गंगाखेडचे तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर व दुसरे तपास अधिकारी तथा सोनपेठ पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक सदानंद येरेकर यांनी तसेच सोनपेठ पोलीस ठाण्याचे एस. बी. देवकते, सहायक पोलीस निरीक्षक गोरखनाथ भोळे, शेळगावचे पोलीस पाटील सुनील गोरे व आश्रोबा कुऱ्हाळे यांच्या मदतीने सखोल तपास करीत आरोपी विष्णू गोरे यांस मोठय़ा शिताफीने अटक केली. दोषारोप दाखल केल्यानंतर एकूण २३ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये मूळ फिर्यादी, डॉक्टरांचा वैद्यकीय अहवाल, शेळगाव येथील किराणा दुकानदार तथा साक्षीदार गोविंद दातार तसेच आरोपीस मुलीला घेऊन जाताना पाहणारा प्रथम साक्षीदार शेषराव दणदणे यांच्या साक्षी अतिशय महत्त्वाच्या ठरल्या. युक्तिवादानंतर आरोपीस मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली.