वन विभाग व महसूल विभाग अंधारात, सहायक पोलीस आयुक्तांची कारवाई
पनवेलचा आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रकल्प ज्या जमिनीवर होणार आहे, तेथील कांदळनाचे पुनर्वसन होण्याअगोदर त्यांची कत्तल करण्याचा सपाटा लावणारी टोळीने पनवेलमध्ये धुमाकूळ घातला आहे. तालुक्यातील पारगाव येथून वाघिवली गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या खाडीकिनारपट्टीवरील शेकडो एकरावरील कांदळवनाची कत्तल करून तेथे वाळूउपसा होत असल्याचे मंगळवारी पोलिसांच्या छापासत्रात उघड झाले आहे.
पनवेलच्या सहायक पोलीस आयुक्तांच्या पथकाने हे छापे टाकले. या घटनास्थळावरून पोलिसांनी सुमारे ५०० ब्रास वाळू, १७ उपसा पंप आणि पाच बोटी असे साहित्य जप्त करून महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना कारवाईसाठी सोपवले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या परिसरातील सुमारे ४० ग्रामस्थांनी वाळू उपशासाठी कांदळवनाची कत्तल केली आहे . रात्री उशिरापर्यंत घटनास्थळावर महसूल विभागाचे अधिकारी पंचनामा करीत होते. मात्र वन विभागाचे अधिकारी आले नव्हते. या परिसराचे तलाठी बुरुज यांनी या परिसरात यापूर्वी महसूल विभागाने कारवाई केली असल्याचे मान्य केले. तरीही वाघिवली येथील अवैध वाळुउपसा आणि कांदळवनाच्या कत्तलीचे सत्र सुरूच होते. ज्या परिसरातील कांदळवनांची कत्तल झाली आहे. तो परिसर निम्मा एनआरआय आणि निम्मा पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने रात्री उशिरापर्यंत याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.