मराठा आरक्षणासाठी गेल्या १६ दिवसांपासून आझाद मैदानात काळ्या फिती आणि काळे झेंडे घेऊन उपोषण करणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी अखेर उपोषण मागे घेतले आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची मध्यस्थी यशस्वी ठरली आहे. १० दिवसांत मागण्या पूर्ण कराव्यात, अन्यथा पुन्हा आंदोलन करु, असा इशाराही आंदोलकांनी उपोषण मागे घेताना दिला आहे.

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक आझाद मैदानात उपोषणाला बसले होते. सरकारने आमची साधी दखलही घेतली नाही असा आरोप आंदोलकांनी केला होता. सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला होता. अखेर सरकारने या आंदोलनाची दखल घेतली. शनिवारी गिरीश महाजन यांनी उपोषणाला बसलेल्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. यादरम्यान मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आणि गिरीश महाजन यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. विधिमंडळ अधिवेशनात याबाबत योग्य तो निर्णय घेऊ, असे आश्वासन त्यांनी दिले. या तरुणांच्या मागण्या ९ मागण्यात आहेत. यातील मुख्य मागणी आरक्षणाची आहे. आरक्षणाबाबत तातडीने निर्णय घेतला जाईल, असे महाजन यांनी सांगितले. चर्चेअंती कार्यकर्त्यांनी उपोषण मागे घेण्याची घोषणा केली. अधिवेशनाच्या काळात म्हणजेच पुढील १० दिवसांत मागण्या पूर्ण कराव्यात, अन्यथा पुन्हा आंदोलन करु, असा इशाराही या प्रसंगी देण्यात आला. सरकारने मागण्या पूर्ण केल्या नाही तर राज्यातील मराठा समाजाने आझाद मैदानातील उपोषणात सामील व्हावे, असे आवाहनही मराठा क्रांती मोर्चातर्फे संभाजी पाटील यांनी केले.

दरम्यान, आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मराठा समाज मागासच असून या समाजास आरक्षणाची गरज असल्याचे शास्त्रोक्त विश्लेषण करणारा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल गुरुवारी राज्य सरकारला सादर झाला. वैधानिक कारवाई पूर्ण होऊन या महिनाअकेरीस मराठा समाजाला आरक्षण लागू होईल. त्यामुळे आंदोलनाऐवजी १ डिसेंबरला जल्लोष करा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी शनिशिंगणापूरमधील संमेलनात केले होते.